श्रीगोंद्यात भुमिअभिलेख कार्यालयाला युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी ठोकले टाळे

येथील भूमी अभिलेख कार्यालयातील विविध प्रलंबित प्रकरणांची चौकशी करून तातडीने निकाली काढावी, या मागणीसाठी युवक काँग्रेसच्या वतीने आज जोरदार आंदोलन करण्यात आले. भूमी अभिलेख उपअधीक्षक  सुहास जाधव यांच्या कार्यकाळातील गैरव्यवहार, विलंबित प्रकरणे आणि गैरहजेरीबाबत चौकशी करण्यासाठी कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले.

आंदोलकांच्या मुख्य मागण्या:

गैरहजेरीची चौकशी: जाधव यांनी कोणत्या कारणास्तव वरिष्ठांना कल्पना न देता रजा घेतली आणि किती दिवस गैरहजर राहिले, याची खातेनिहाय चौकशी करावी.

मोजणी प्रकरणांची पडताळणी: त्यांच्या कार्यकाळातील मोजणी प्रकरणांचे वाटप, प्रलंबित व निकाली काढलेली प्रकरणे यांची सविस्तर माहिती जाहीर करावी.

शहरी व ग्रामीण प्रकरणे: वारस नोंद, हक्क सोड प्रमाणपत्र, विविध नक्कल प्रत यांसाठी दाखल अर्जांवर किती कालावधीत निर्णय घेतले जातात, याची तपासणी करून प्रलंबित प्रकरणे किती दिवसांत निकाली निघतील, याबाबत लेखी हमी द्यावी.

या आंदोलनात युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत ओगले, तालुकाध्यक्ष विकास काळे, तसेच प्रविण ढगे, संतोष भोईटे, अमोल भोसले, भाऊसाहेब डांगे, संदीप वागसकर, गोरख कानडे, भाऊ गावडे, युवराज शेळके, आप्पा कणसे, आयुब शेख, जहीर सैय्यद, दादा काटकर आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.

युवक काँग्रेसच्या या आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव निर्माण झाला असून, प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रशासन काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.