२० किलोमीटरच्या वाहनांना टोलमाफी द्यावी यासाठी पुन्हा आंदोलन
संजय आ. काटे
श्रीगोंदा, ता. २० : अहिल्यानगर- दौंड महामार्गावरील सांगवीदुमाला ते निमगावखलू या दरम्यान असणारा पथकर नाका (टोल) आसपाच्या गावातील वाहनधारकांच्या खिशाला कात्री लावतोय. महामार्गाच्या कामातील अनेक नियम पायदळी तुटविणाऱ्या ठेकेदाराला व त्याला पाठीशी घालणाऱ्या सरकार, प्रशासन व लोकप्रतिनिधी यांना आता लोक जाब विचारु लागले आहेत. पण या टोलच्या ठेक्यात कुणाची भागीदारी आहे, एकात इतर दोघे कोण आहेत याची उलटसुलट सुरु असणारी चर्चा राजकीय नेत्यांपर्यंत येवून ठेपली आहे.
सांगवीदुमाला ते निमगावखलू या दरम्यान हा टोलनाका उभारण्यात आला आहे. महामार्गाचे काम झाले असले तरी अनेक ठिकाणी रस्ता निकृष्ट आहे. लोणीव्यंकनाथ जवळील रेल्वेगेट येथील रस्ता खचलेला आहे. चिखली घाटातील रस्त्यालाही मोठे खड्डे आहेत. त्याशिवाय सिमेंट क्राॅक्रिटीकरण असणाऱ्या रस्त्यावर मोठे क्रॅक पडले आहेत. पुर्वीच्या रस्त्याच्या कडेला असणारी दुतर्फा झाडे कामाच्या वेळी काढण्यात आली. ती पुन्हा लावून देण्याचा नियम नव्हे तर कायदाच आहे. पण संबधीत ठेकेदाराने ही झाडे अजूनही लावलेली नाहीत, त्यामुळे त्यांचे संगोपन करण्याचा विषयही येत नाही. हजारो झाडांची कत्तल केल्यानंतर व ती पुर्ववत लावली नसताही टोल सुरु झाला.
हा रस्ता तीन पदरी आहे. रस्त्याचा मध्यभागी दुभाजक नसल्याने अपघातांची संख्या मोठी आहे. पण जर दुभाजक नाहीत तर संपु्र्ण रस्त्याला रिफ्लेक्टर ( परावर्तक) लावणे बंधनकारक आहे. पण तो खर्च टाळण्यात आला आहे. अनेक ठिकाणी महामार्गाची रुंदी कमी करण्यात आली आहे. अशा अनेक त्रुटी असणाऱ्या रस्त्यावर टोलनाका मात्र सुरु झाला आहे.
पण अशा परिस्थितीत आता टोल देणे व तेही जवळच्या लोकांना शक्य नाही. त्यामुळे व्यापारी व काही तरुणांनी एकत्र येत टोलनाका बंद पाडला. त्यात काही राजकीय नेते, कार्यकर्तेही सहभागी झाले होते.
टोलबद्दल अनेक आंदोलने झाली आहेत. पण आता काही लोकांनी याप्रश्नी उल्लू बनविण्याचे उद्योग सुरु केल्याची चर्चा आहे. संबधीत ठेकेदाराशी चर्चा करुन काही लोकांनी त्यात भागीदारही घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता निमगावखलू, सांगवी, काष्टी या भागातील ठराविक लोकांची वहाने टोलफ्री करण्याचे आश्वासन देवून हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सुरु आहे. आता काष्टी व्यापारी संघटना व आसपासच्या गावातील तरुणांनी एकत्र येत टोलविरोधात मोहिम हाती घेतली आहे. वीस किलोमीटर अंतराच्या गावातील वाहनांना टोलमाफी मिळावी एवढीच मागणी त्यांची आहे. पण ठेकेदार, पोटठेकेदार या लोकांना न जुमानता प्रशासन व ठराविक नेत्यांना हाताशी धरुन आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यातच या टोलनाक्यात दोन व्यक्तींची भागीदारी असून राजकीय युती करण्यात माहिर असणारे दोघे टोलमध्येही एकत्र आल्याने प्रशासन त्यांच्याच मर्जीत असल्याचे बोलले जाते. पण आता व्यापारी व गावकऱ्यांनी भूमिका मान्य करावीच लागणार आहे. त्यासाठी सोमवारी (ता. २१) टोलनाक्यावर धरणे आंदोलन होत आहे. त्यात निर्णय झाला नाही तर गावे बंद ठेवण्याचा निर्णय होवू शकतो.
याबाबत काष्टी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संजय काळे व युवा कार्यकर्ते ऋषिकेश भोईटे म्हणाले की, आसपास जे टोलनाके आहेत त्यांनी ही सवलत दिलेली आहे. पण सदर ठेकेदार जर मुजोरपणा करीत असेल तर आम्ही महामार्गाचे काम, टोलनाक्यातील नियमांची पायमल्ली याबाबत थेट न्यायालयात जाणार आहोत.