जागा सेफ झोन मध्ये असल्याने सभेची गरज नसल्याचा दावा….
संजय आ. काटे
श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विक्रम पाचपुते यांच्या प्रचारार्थ माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार नसल्याचे समजते.
श्रीगोंद्याची सीट सेफ झोनमध्ये असल्याने फडणवीस यांच्या सभा होणार नसल्याचे सांगण्यात येत असले तरी, वेगळे काही नाही ना याचीही खात्री श्रीगोंद्यातील भाजप नेत्यांना करावी लागणार आहे.
यापूर्वी प्रत्येक महत्त्वाच्या निवडणुकात फडणवीस यांची येथे प्रचार सभा झाली आहे. परंतु फडणवीस आले की ‘साकळाई’चा मुद्दा पुन्हा एकदा ताजा होईल ही भीती भाजपाला वाटत आहे का ? व त्यामुळेच फडणवीस यांची सभा टाळली जात नाही ना अशीही शंका आहे.
दरम्यान आमदार बबनराव पाचपुते हे देवेंद्र फडणवीस यांच्या गुडबुक मध्ये आहेत. त्यामुळे पहिल्याच यादीत त्यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी जाहीर झाली. असे असताना अचानकपणे उमेदवारी बदलून विक्रम पाचपुते यांच्याकडे ती आली. आता प्रचाराचा अंतिम टप्पा सुरू झाला असताना भारतीय जनता पक्षाचे ज्योतिरादित्य शिंदे यांची एकमेव सभा श्रीगोंद्यात झाली. यापूर्वी श्रीगोंद्यात भाजपाच्या नेत्यांच्या व विशेष करून देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक सभा निवडणूक काळात होत आल्या आहेत. याही परिस्थितीत यंदा विक्रम पाचपुते हे तरुण उमेदवार पक्षाने दिले असताना, पक्षाचे वरिष्ठ नेते सभेला का येत नाहीत याविषयी उत्सुकता आहे.
त्यातच राष्ट्रवादीवर नाराज होऊन अपक्ष उमेदवारी करीत असलेले माजी आमदार राहुल जगताप यांच्याही संपर्कात भाजपाचे काही वरिष्ठ नेते असल्याचा आरोप नुकताच नेते बाबासाहेब भोस यांनी केला होता. या आरोपात किती टक्के आहे हा नंतरचा भाग असला तरी भोस यांच्या या आरोपानंतर राजकीय चर्चेला वाव मिळाला आहे. जगताप हे विजयाच्या स्पर्धेत असल्याने भोस यांच्या आरोपाचा हा धागा असू शकतो अशी दबक्या आवाजात चर्चा आहे.