सरासरीपेक्षा ३५२ मिलीमीटर जास्तीचा पाऊस
संजय आ. काटे
Agricultural News श्रीगोंदा, ता. २५ : रब्बीचा तालुका म्हणून ओळख असणाऱ्या श्रीगोंदेकरांना यंदा खरीपातच वरुणराजाने चांगलेच झोडपले आहे. आजअखेर सरासरीपेक्षा ३५१.७ मिलीमीटर जास्त पावसाची नोंद झाली आहे.
जून ते सप्टेंबर या पावसाळी महिन्यात श्रीगोंदा तालुक्यात सरासरी ४०२ मिलीमीटर पावसाचा अंदाज असतो. पण यंदा ऑगस्ट महिना संपण्याला आठवडा बाकी असतानाच सरासरीपेक्षा ३५२ मिलीमीटर जास्तीचा पाऊस झाला आहे.
जास्तीचा पावसाने पिकांची हानी….
कृषी विभागाच्या माहितीनूसार आजपर्यंत तालुक्यात ५८०.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. एरव्ही याच दरम्यान हाच पाऊस साधारण २२८.६ मिलीमीटर होणे अपेक्षीत होते. तो मोठ्या प्रमाणात जास्त झाला आहे. हा जास्तीचा पाऊस पुढच्या दृष्टीने चांगला असला तरी शेतात उभ्या असणाऱ्या काही पिकांसाठी अडचणीचा ठरत आहे. भाजीपाल्यासह इतर पिकांची वाढ खुंटली आहे. ढगाळ हवामान आणि सततचा पाऊस यामुळे साठलेल्या पाण्याने पिके सडली आहेत.
या चार मंडलात अतिवृष्टी….
तालुक्यातील काही ठिकाणी १८ ऑगस्टला रात्री अतिवृष्टी झाली आहे. त्यात श्रीगोंदा – ९१.३ मिलीमीटर, काष्टी- ७२.८ मिलीमीटर, मांडवगण- ७१.८ मिलीमीटर व कोळगाव ८०.५ मिलीमीटर अशा विक्रमी पावसाची नोंद झाली. २४ तासात जर ६५ मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडला तर तो अतिवृष्टीत गणला जातो. या चारही मंडलात अतिवृष्टी झाल्याने त्या परिसरातील नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार क्षितीजा वाघमारे यांनी दिलेले आहेत.
विम्याचे कवच कसे वापरावे…..
तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर यांनी सांगितले की, एकाच परिसरात २४ तासात ६५ मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस झाल्यावर अथवा शेतात पाणी साठवून राहिल्यास संबंधीत शेतकऱ्याने ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीला ७२ तासांच्या आत कळविणे बंधनकारक आहे. त्यासाठी त्यांचा टोल फ्री क्रमांक १४४४७ याचा उपयोग करावा. अथवा ओरिएन्टल कंपनीचे अॅप- क्राॅप इन्शुरन्स हे डाऊनलोड करुन त्यावर माहिती दिल्यास कंपनीचे लोक येवून पाहणी करतील.
गेल्यावर्षी पाऊस कमी पडल्याने २४ कोटी…
गेल्यावर्षी याच दोन महिन्यांच्या कालखंडात तालुक्यातील बहुतेक भागात पाऊस कमी पडला अथवा झाला नव्हता. त्यामुळे भुईमूग,बाजरी, मूग, मका ही पिके पाण्याअभावी अडचणीत येवून उत्पादन घटले होते. परिणामी विमा कंपन्यांना संपर्क साधून शेतकऱ्यांना तब्बल ४८ कोटी रुपयांची भरपाई मिळाली होती अशी माहिती तालुका कृषी अधिकारी सुपेकर यांनी दिली. विमा कंपनींकडून भरपाई घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अलर्ट राहण्याची आवश्यकता आहे.