श्रीगोंद्यात तुतारी वाजणार, की मशाल पेटणार

महाविकास आघाडीकडून कोण ? राहूल जगताप की साजन पाचपुते

संजय आ. काटे

Shrigonda Political News श्रीगोंदा, ता. २१ : दहा वर्षांपुर्वी राहूल जगताप (Rahul Jagtap) या तरुण चेहऱ्याला श्रीगोंद्याचे आमदार करण्याची किमया शरद पवार (Sharad Pawar) यांनी केली होती. आता पुन्हा एकदा जगताप महाविकास आघाडीकडून उमेदवारीसाठी प्रयत्नशिल असले, तरी त्यांना यावेळी साजन पाचपुते (Sajan Pachpute) या तरुण चेहऱ्याचा मोठा अडसर आहे. शिवसेनेचा (उध्दव ठाकरे गट) भक्कम पाठींबा दिसतोय. परिणामी उमेदवारीसाठी तुतारी वाजणार की मशाल पेटणार यावरुन महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु झाली आहे.
महाविकास आघाडीत भाजपाचे आमदार असल्याने उमेदवारी त्यांच्याकडेच जाईल असे चित्र असले तरी राष्ट्रवादीच्या अनुराधा नागवडे याही उमेदवारीसाठी प्रयत्नशिल आहेत. दरम्यान महाविकास आघाडीत उमेदवारीवरुन सध्यातरी खेचाखेची दिसतेय. या जागेवर माजी आमदार या नात्याने राहूल जगताप यांचाच हक्क आहे. पण काही महिन्यांपुर्वी शिवसेनेत दाखल झालेले काष्टीचे सरपंच व नंतर सेनेचे उपनेतेपद मिळालेले साजन पाचपुते यांनीही उमेदवारीसाठी दंड थोपटले आहेत. सेनेचे जेष्ठनेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या वरदहस्ताने श्रीगोंद्याची आघाडीची जागा आपल्याकडेच येईल असा त्यांचा आत्मविश्वास असून ते कामालाही लागले आहेत. अनेक गावांमध्ये त्यांनी खाजगी निधी वाटपातून विकास कामे सुरु केल्याने त्यांचे प्रयत्न दिसून येतात. त्याचवेळी काँग्रेसमध्ये गेलेले जेष्ठनेते घनशाम शेलार यांनाही आघाडीची उमेदवारी त्यांनाच मिळेल अशी खात्री आहे. जिल्ह्याचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून ते ही जागा पक्षाला सोडून पुन्हा एकदा हाताला साथ मागत आहेत. पण काँग्रेसला उमेदवारी मिळेल अशी शक्यता सध्या तरी वाटत नाही.
एकीकडे साजन पाचपुते जोरात निघाले असतानाच राहूल जगताप उमेदवारीवरुन बिनधास्त वाटतात. शरद पवार यांनी कामाला लागण्याचे आदेश मागेच दिले असून ही जागा राष्ट्रवादी (शरद पवार गट) सोडणार नाही असे ते छातीठोकपणे सांगत आहेत. त्याचवेळी साजन पाचपुते हेही जागा आम्हालाच मिळणार व तसे आदेश संजय राऊत यांनीच दिल्याचे तेही मांडीवर थाप मारुन सांगत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत उमेदवारीचा गोंधळ आहे असे म्हणण्यास वाव आहे.
राहूल जगताप यांच्या जमेच्या बाजू म्हणजे ते कुकडी पट्ट्यातील तगडे नेते असून त्यांना नगर तालुक्यातील दोन गटांमध्ये वाव आहे. तरुणांमध्ये वेगळी क्रेझ असतानाच, त्यांच्याकडे पवारांची पाॅवर आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीबाबत कार्यकर्ते बिनधास्त आहेत. त्याचवेळी कुकडी कारखान्याचे उसाचे थकीत पेमेंट, कमी झालेला संपर्क ही त्यांच्यासाठी डोकेदुखी असणार आहे.

साजन पाचपुते यांचा तरुण चेहरा व काष्टीसारख्या गावात संरपचपद त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. पक्षाकडून त्यांना मिळणारा ‘फ्री हँण्ड’ त्यांना मतदारसंघात संधी निर्माण करुन देतोय.नगर तालुक्यात शिवसेनेला मानणारा कार्यकर्त्यांचा तगडा गट आहे. त्याचवेळी त्यांच्या मालकीचा साजन शुगर कारखान्याचा गेला हंगाम बंद राहिला आहे. त्यांचा ठराविक भागातच संपर्क आहे हे त्यांच्या अडचणीतील प्रमुख कारण आहे.

——

महाविकास आघाडीत राहूल जगताप यांचे वडील दिवंगत कुंडलिकराव (तात्या) जगताप व साजन पाचपुते यांचे वडील दिवंगत सदाशिव (अण्णा) पाचपुते यांना आमदार होता आले नाही. पण आमदारकीचे सगळे अधिकार या दोघांनीही स्वकतृत्वावर मिळविले. या दोघांचीही उणिव तालुक्याला भासते. आता त्यांचे वारसदार ती उणिव भरुन काढतात का ते पाहवायचे आहे.