विक्रमसिंह पाचपुते यांना उमेदवारी द्या आई-वडिलांची इच्छा
संजय आ. काटे
जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात हॉट असणारा श्रीगोंदा तालुका सध्या उमेदवारी मागणीने आणि उमेदवारी बदलाच्या परस्पराविरोधी संघर्षात गाजतोय. भारतीय जनता पक्षाने डॉ. प्रतिभा पाचपुते यांची उमेदवारी काल जाहीर केली. पण त्याचे पडसाद त्यांच्या कुटुंबात लगेच जाणवले. विक्रमसिंह पाचपुते हे उमेदवारीसाठी इच्छुक असताना त्यांच्या आईला उमेदवारी गेल्याने काहीशी अस्वस्थता निर्माण झाली. आमदार बबनराव पाचपुते व डॉ. प्रतिभा पाचपुते या तातडीने मुंबईला रवाना झाले. थोड्याच वेळात पक्ष नेतृत्व सोबत चर्चा करून विक्रम सिंह यांना उमेदवारी द्यावी अशी त्यांची मागणी राहणार आहे या परिस्थितीत नेमके काय होते याकडे लक्ष आहे.
महाविकास आघाडीत श्रीगोंद्यात माजी आमदार राहुल जगताप व जिल्हा बँकेच्या संचालिका अनुराधा नागवडे यांच्यात उमेदवारीवरून मोठा संघर्ष सुरू आहे. दोघांनीही त्यांच्या पातळीवर राजकीय कसब पणाला लावून सर्व पर्याय खुले ठेवून उमेदवारी मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यांच्या उमेदवारीबाबत आज फैसला होणार असल्याची शक्यता असली तरी नेमकी कोणाला उमेदवारी मिळेल हे दोन्ही बाजूने दावा केला जातोय.
दरम्यान भारतीय जनता पक्षाने काल आमदार बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांची उमेदवारी जाहीर केली. या जागी त्यांचे पुत्र विक्रमसिंह पाचपुते यांना उमेदवारी मिळेल असा अंदाज बांधला जात होता. परंतु पक्षाने प्रतिभा पाचपुते यांचे नाव जाहीर करून धक्का दिला. त्यामुळे पाचपुते गटाने मतदारसंघात लावलेले राजकीय गणित विस्कळीत होत असल्याचे दिसते. या पार्श्वभूमीवर आमदार पाचपुते हे पत्नी प्रतिभा पाचपुते यांना सोबत घेऊन काल रात्रीच मुंबईला रवाना झाले. आज सकाळी ते पक्ष नेत्यांशी चर्चा करून उमेदवारी प्रतिभा पाचपुते यांच्या ऐवजी विक्रमसिंह पाचपुते यांना द्यावी अशी मागणी करणार असल्याचे समजते.
आता हा पक्ष नेतृत्वाचा विषय असला तरी उमेदवारी बदलली जाऊ शकते असा अंदाज भाजपातील राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत. त्याचे सर्वात महत्त्वाचे कारण भाजपा अंतर्गत पाचपुते यांना सध्या कोणीही विरोधक नाही. त्यामुळे भाजप पुढेच पेच निर्माण होणार आहे. पाचपुते यांना झुकते माप द्यावेच लागणार आहे त्यामुळे श्रीगोंद्याची उमेदवारी विक्रमसिंह यांच्या गळ्यात पडली तर आश्चर्य वाटायला नको. पण पक्षाने जर ठरवले की, महिला उमेदवारच द्यायच्या तर विक्रमसिंह पाचपुते यांना थांबावे लागेल.
दरम्यान महाविकास आघाडीच्या वतीने राहुल जगताप की अनुराधा नागवडे हेही स्पष्ट होणार आहे. नागवडे यांनी काल राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सर्व पदांचे राजीनामे दिले. त्यामुळे त्यांना आता मशाल हाती घ्यावी लागेल किंवा अपक्ष लढावे लागेल हे पहावे लागेल. जगताप व नागवडे हे दोघेही महाविकास आघाडीच्या उमेदवारीचा दावा करीत आहेत.
सर्व्हेक्षण काय सांगते ?
भाजपाने मतदारसंघात अनेत सर्व्हे केले आहेत. त्यात प्रतिभा पाचपुते व विक्रमसिंह पाचपुते यांच्यातील फरकही पक्ष चाचपणी करु शकतो. पण आमदार बबनराव पाचपुते यांच्या आग्रहाला पक्षनेते नकार देणार नसल्याचे बोलले जात असल्याने उमेदवारीबाबतच्या घडामोडीकडे लक्ष आहे.