घोड धरणाच्या दुसऱ्या आवर्तनाची प्रतिक्षा संपली
– संजय आ. काटे
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा व कर्जत तसेच पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील शेती ओलिताखाली आणणाऱ्या घोड धरणाच्या रब्बी हंगामातील दुसऱ्या आवर्तनाची प्रतिक्षा अखेर संपली आहे.
डाव्या कालव्यातील आवर्तन आज संध्याकाळी सोडण्यात आले, तर उजव्या म्हणजेच शिरूर तालुक्यातील आवर्तन २५ फेब्रुवारी रोजी सोडले जाणार आहे.
श्रीगोंदा आणि बागायती भागाला दिलासा…
घोड धरणाच्या पाण्यावर श्रीगोंदा तालुक्यातील पूर्वीचा बागायती भाग अवलंबून आहे. सध्या ऊस, कांदा, गहू, हरभरा आणि फळबागांसाठी पाण्याची मोठी गरज असल्याने हे आवर्तन कधी सुरू होणार याची उत्सुकता लाभधारकांना होती.
आज संध्याकाळी ५ वाजता, चिंचणी (ता. शिरूर) येथील घोड धरणातून डाव्या कालव्याचे शेतीसाठीचे आवर्तन सोडण्यात आले. हे आवर्तन साधारणतः १५ मार्चपर्यंत चालणार आहे. त्यामुळे कांदा, गहू आणि हरभरा या पिकांना मोठा फायदा होईल.
पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन
शेतकऱ्यांनी या आवर्तनातील पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. योग्य नियोजन केल्यास जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली येऊ शकते.