संजय आ. काटे
श्रीगोंदा-शिरूर सहरहद्दीवरील दाणेवाडी येथे एका १९ वर्षीय तरुणाची निघृण हत्या झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. माऊली सतीश गव्हाणे या तरुणाचा निर्घृण खून करून त्याचे शरीर तुकडे-तुकडे करण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांना अद्याप कोणताही ठोस धागा मिळालेला नाही. गळ्यात तुळशीमाळ आणि वारकरी संप्रदायात शिक्षण घेतलेल्या या तरुणाचा असा अंत झाल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
माऊली गव्हाणे बेपत्ता… आणि छिन्नविछिन्न मृतदेहाचा शोध
माऊली गव्हाणे हा तरुण शिरूर येथील महाविद्यालयात बारावीमध्ये शिकत होता. ६ मार्च रोजी रात्री १२ वाजता तो घरातून बाहेर पडला आणि पुन्हा परतलाच नाही. कुटुंबीयांनी शोधाशोध केली, पण तो न मिळाल्याने ९ मार्च रोजी शिरूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
दरम्यान, १२ मार्च रोजी गावातील एका विहिरीत डोके, हात आणि पाय नसलेला मृतदेह आढळून आला. माऊलीच्या कुटुंबीयांनी त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला, मात्र मृतदेहाची अवस्था अत्यंत खराब असल्याने त्यावेळी खात्री करता आली नाही. मात्र, १५ मार्च रोजी शेजारच्या विहिरीत डोके, हात आणि पाय मिळाल्यानंतर हा मृतदेह माऊलीचाच असल्याचे स्पष्ट झाले.
हत्या की अन्य काही? पोलिसांसमोर मोठे आव्हान
माऊली बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या बँक खात्यातून ₹५०,००० रुपयांचे ट्रान्झेक्शन झाले असल्याची चर्चा आहे. मात्र, यासंबंधी पोलिसांकडून कोणताही अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. शिवाय, त्याचा मोबाईल अद्याप सापडलेला नाही, त्यामुळे हत्येचे कारण काय, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
पोलिसांची तपास मोहीम सुरू
या घटनेनंतर गावकऱ्यांनी पोलिसांविरोधात नाराजी व्यक्त करत तातडीने न्यायाची मागणी केली आहे. यानंतर, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घातले असून, जिल्हा पोलिस अधीक्षक राकेशकुमार ओला, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत खैरे व विवेकानंद वाखारे, तसेच बेलवंडीचे पोलिस निरीक्षक संतोष भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण विभागाने तपास सुरू केला आहे.
गावकऱ्यांची संतप्त मागणी – हत्येचा उलगडा करावा
वारकरी संप्रदायातील हा निष्पाप युवक अशा क्रूर पद्धतीने मारला गेला, यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी लवकरात लवकर या गुन्ह्याचा छडा लावून दोषींना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
➡️ या भयानक हत्याकांडाचा तपास कोणत्या दिशेने जातो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
घटनेचा क्रम:
✔ ६ मार्च: रात्री १२ वाजता माऊली घराबाहेर पडला आणि पुन्हा परतला नाही.
✔ ९ मार्च: बेलवंडी पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल.
✔ १२ मार्च: गावातील विहिरीत डोके, हात आणि पाय नसलेला मृतदेह आढळला.
✔ १५ मार्च: शेजारच्या विहिरीत डोके, हात व पाय सापडले, मृतदेह माऊलीचाच असल्याचे स्पष्ट.
तपासातील महत्त्वाचे मुद्दे:
➡ आसपास असणारे सिसीटिव्ही कॅमेऱ्यातून काही मिळते का याचा शोध सुरु .
➡ मोबाईल अद्याप सापडला नाही – हत्येच्या मुख्य धाग्यांचा शोध घेण्यात अडथळा.
➡ मित्रांकडे पोलिसांची चौकशी सुरू, मात्र ठोस धागा नाही.
पोलिस तपास:
🔎 जिल्हा पोलिस अधीक्षक राकेशकुमार ओला, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत खैरे, विवेकानंद वाखारे आणि बेलवंडी पोलिस निरीक्षक संतोष भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू.
🔎 गुन्हे अन्वेषण विभाग (पुणे व नगर) आणि स्थानिक पोलिस पथक हत्येचा उलगडा करण्यासाठी प्रयत्नशील.
गावकऱ्यांचा संताप:
⚠ गावकऱ्यांत भीतीचे वातावरण, पोलिसांच्या निष्क्रीयतेवर नाराजी.
⚠ दोषींना त्वरित अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी.
⚠ माऊलीसारख्या निष्पाप तरुणाची अशी क्रूर हत्या का? याचा उलगडा होईपर्यंत गावकऱ्यांनी संघर्ष करण्याची भूमिका घेतली.
➡ या भयानक हत्याकांडाचा पुढील तपास कोणत्या दिशेने जातो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.