तुतारी मिळू न देण्यासाठी आघाडीतील नेत्यांची यंत्रणा कार्यरत
—
संजय आ. काटे
श्रीगोंदा, ता. १ : माजी आमदार राहूल जगताप यांना शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे तुतारी चिन्ह मिळू नये, यासाठी श्रीगोंद्यातून मोठी यंत्रणा राबत आहे. अनेक शिष्टमंडळे आणि काही नेते शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भेटी घेत आहेत. जगताप यांना उमेदवारीपासून रोखण्यासाठी ही यंत्रणा राबत असतानाच, ‘दुसरे कुणालाही द्या पण जगताप यांना नको’ अशी भूमिका घेतली जात असल्याची खात्रीशिर माहिती आहे.
गेल्या विधानसभा व नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत शरद पवार यांची श्रीगोंद्यात मोठी राजकीय ताकत आहे हे पुन्हा सिध्द झाले. गेल्या विधानसभेला घनशाम शेलार यांची जी लाट तयार झाली, त्याला पवार यांची सभा कारणीभुत ठरली होती. तर खासदार नीलेश लंके यांच्या विजयातही पवार यांचाच मोठा वाटा आहे. त्यामुळे यंदाच्या विधानसभेला पवार यांचा उमेदवार म्हणजे ‘जमेची बाजू’ याची कल्पना नेते व प्रमुख कार्यकर्त्यांना आलेली आहे.
त्यातच पवार यांच्या राष्ट्रवादीतून राहूल जगताप हे एकमेव नेते उमेदवारीचे प्रबळ दावेदार आहेत. काही दिवसांपुर्वी श्रीगोंद्यात जयंत पाटील व खासदार अमोल कोल्हे यांनी, जगताप यांचे कौतुक केले आणि लोकांसमोर ‘तुमच्या मनातीलच उमेदवार देवू’ अशी घोषणाही करुन टाकली. कार्यक्रमाचे सगळे नियोजन जगताप यांनी केले होते. समोर त्यांचेच समर्थक होते, अशा वेळी पाटील यांचे हे बोल म्हणजे जगताप यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब समजले गेले.
पाटील येवून गेले आणि जगताप यांच्या विरोधातील स्वकीयांची यंत्रणा कामाला लागली. ‘साहेब’ आणि पाटील यांच्या भेटीचे सत्रच सुरु झाले. राहूरी येथे पाटील यांच्या भेटीसाठी राहूल जगताप यांचे जवळचे सहकारी व आघाडीचे एक नेते गेले असल्याची चर्चा आहे. तेथील चर्चा समजली नसली तरी जगताप यांच्याविरोधात रान पेटविण्याचा प्रयत्न होता असे दिसते.
शरद पवार यांची भेट एका शेतकरी शिष्टमंडळाने घेतल्याचेही समजते. कुकडी कारखान्याबाबतच्या अडचणी तेथे मांडल्या असल्याचे बोलले जाते. पण खुद्द राहूल जगताप यांनीच, याबद्दल थेट भाष्य करुन ‘येत्या पाच आक्टोंबरपर्यंत सगळी थकीत देणी देणार’ असल्याचे जाहीर केले आणि त्याला जयंत पाटील यांनीही दुजोरा दिला आहे. त्यामुळे राजकीयदृष्ट्या व राष्ट्रवादीसाठी तो विषय सध्या तरी संपलेला असला, तरीही हा विषय पुढे आणण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसते.
दरम्यान आजही शरद पवार यांची भेट काही नेत्यांनी घेतली. तीत नेमके काय झाले असेल याचा अंदाज राजकीय जाणकार बांधून आहेतच. एकुणच, ‘दुसरे कुणीही द्या पण जगताप यांना तुतारी नको’ अशी भूमिका काही नेत्यांची समोर येत असल्याने सध्या जगताप यांना लक्ष्य केले जात असल्याचे दिसते. पण यामुळे शरद पवार यांच्याजवळ जगताप यांचे वजन वाढत असल्याचे या नेत्यांच्या लक्षात येत नाही हेही खरे आहे.