गेल्यावेळचा बदला घेण्याची संधी, कार्यकर्त्यांची ‘लढा’ ही अपेक्षा
संजय आ. काटे
श्रीगोंदा, ता. ९ : गेली चाळीस वर्षे तालुक्यातील लोकांच्या समस्या हाती घेवून त्यांना न्याय देण्यासाठी लढणाऱ्या घनशाम शेलार यांची आमदारकीची संधी गेल्यावेळी थोडक्यात हुकली. आमदार बबनराव पाचपुते यांच्यामुळे शेलार यांचा निसटता पराभव झाला की, नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी ऐनवेळी पाचपुते यांच्या व्यासपिठावर जावून, त्यांची प्रचारयंत्रणा हाती घेतल्याने शेलार यांचा आवाक्यातील विजय हिरावला गेला याची चर्चा अजूनही सुरु आहे. पण यावेळी नागवडे लढणारच आहेत त्यामुळे शेलार त्या अपमानाचा बदला घेणार का ही उत्सुकता सर्वांनाच आहे.
घनशाम शेलार हे नाव गेल्या काही वर्षात राज्यात गाजले. वेगवेगळ्या कारणांनी कायम चर्चेत राहिलेले हे व्यक्तीमत्व याही निवडणूकीत वेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. चाळीस वर्षांपुर्वी गळ्यात ब्लॅक अॅण्ड व्हाईट कॅमेरा असला तरी तो संसार चालविण्यासाठी होता. घरी पाटीलकी असली तरी त्याचा कधीच गर्व-अहंकार नव्हता. कॅमेरा चालविताना सामाजीक आणि अर्थात राजकीय सुर कधी जुळले हे त्यांनाही समजले नाही. १९८६ साली तरुणांचे संघटन उभे करण्याची जिद्द त्यांच्या मनात पेटली आणि मोजक्याच तरुणांना घेवून श्रीगोंदा तालुक्यात चळवळ उभी केली. गावागावात जावून कार्यकर्त्यांच्या घरची मिरची-भाकरी खावून लोकांच्या प्रश्नांची जाण करुन घेतानाच तरुणांच्या घरासह गावातील प्रश्नांची सोडवणूक करण्याची सुरुवात करणारा हा संघर्ष घेवून जन्माला आलेला त्याकाळचा तरुण आणि आजचा लोकांच्या मनातील आमदार घनशाम प्रतापराव शेलार……उर्फ अण्णा…..
तरुणांची चळवळ उभी करतानाच गळ्यात कॅमेरा होताच, त्यातच हाती पेन धरीत लोकमत या शिखरावीर वर्तमानपत्रात बातमीदार म्हणून काम सुरु केले. त्यांचे अक्षर सुंदर होतेच पण त्यासोबतच समाजातील दुख: मांडण्याची पध्दत आणि त्या प्रश्नांची सोडवणूक करुन घेण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांवर असणारा आदरयुक्त दरारा त्यांनी तयार केला होता. पत्रकाराची ओळख नेहमी कार्यालयातील शिपाई आणि कर्मचाऱ्याशी संबध चांगले असावे लागतात. अण्णांकडे हे कसब जन्मजातच होते. म्हणजे त्यांचे वडील प्रतापनाना वडाळी गावातील एक बडे प्रस्थ होते. त्याकाळी त्यांनी कधी कुणापुढे मान झुकवली नाही पण लोकांच्या कामात सर्वात पुढे होवून कामे कशी करुन घ्यायची तेही त्यांनी अण्णांना अप्रत्यक्षपणे शिकविले अथवा अण्णा त्यांच्याकडे पाहून शिकले.
घनशाम अण्णा गेल्या अनेक वर्षांपासून श्रीगोंदा तालुका, आजचा अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यात अनेकांना माहिती असणारे नाव आहे. अण्णांचे आज वय ६३ आहे. म्हणजे ही त्यांची शेवटची निवडणूक राहिल. पण यंदा पाचपुते, नागवडे यांच्यासह माजी आमदार राहूल जगताप यांची निवडणूक लढण्याची तयारी मोठी आहे. पण या तिघांच्याही बरोबरीने किंबहुना त्यांच्यापेक्षा जास्त संपर्कात असणारा नेता म्हणून आजही शेलार यांचेच नाव घेतले जाते.
२०१९ ला अण्णा यांच्याकडे राष्ट्रवादीचे घड्याळ ऐनवेळी आले. राहूल जगताप व अनुराधा नागवडे या दोघांनीही निवडणूक लढविण्यास असमर्थता दाखविल्याने शरद पवार व अजित पवार यांच्यापुढे घनशाम शेलार यांचा पर्याय होता. त्याकाळी पवार यांची सहानुभुती, पाचपुते यांच्या विरोधातील सुप्त लाट आणि शेलार यांच्यासाठी एकत्र आलेले नेते हे सगळेच जमून आले होते. पण त्याचवेळी तालुक्यातील बडे प्रस्थ असणारे राजेंद्र नागवडे यांनी थेट भाजपात प्रवेश करीत पाचपुते यांच्या व्यासपिठावर जावून प्रचार सुरु केला. त्यांच्या वांगदरी गावात होम टू होम जात त्यांनी पाचपुते यांच्यासाठी यंत्रणा लावली. पण तरीही लोकांनी पाचपुते यांच्याविरोधात शेलार यांच्या पारड्यात मते दिली. पण नागवडे यांचा रेटा मोठा असल्याने शेलार यांचा पराभव निसटत्या मतांनी झाला अशी भावना शेलार यांच्यासह त्यांच्या समर्थकांची आहे.
आता यावेळी शेवटची निवडणूक ते लढणार का अशी चर्चा आहे. पण त्याचवेळी नागवडे, जगताप दोघेही निवडणूक लढणार आहेत. मग शेलार हे काय करणार अशी चर्चा आहे. पण आता नाही तर परत कधीच नाही ही त्यांच्या कार्यकर्त्यांची मानसिकता दिसते. त्यामुळे शेलार यांना जरी महाविकास आघाडीची उमेदवारी मिळाली नाही तरी त्यांना लढावेच लागणार आहे.
नागवडे यांच्या कार्यकर्त्यांचा शेलार यांच्यावर राग का ?
नागवडे व शेलार हे दोघे जवळचे नातेवाईक आहेत. गेल्यावेळचा राजकीय संघर्ष विसरला जात नाही. महिन्यापु्र्वी झालेल्या नागवडे कारखाना वार्षिक सभेत शेलार यांनी कारभारावर ताशेरे ओढल्यानंतर नागवडे समर्थकांनी शेलार यांच्यावर खालच्या शब्दात विरोध नोंदविला. ठराविक कार्यकर्त्यांनी त्यांना एकेरीवर बोलत भाषणात अडथळे आणले. सभा संपल्यानंतरही शेलार व नागवडे समर्थकांमध्ये बाचाबाची झाली. नागवडे यांना निवडणूक करायची आहे. त्यामुळे शेलार यांच्याविरुध्द आक्रमक होण्यापेक्षा समजूतदारपणा घेतला असता तर त्यांच्या हिताचे झाले असते.