अनुराधा नागवडे यांची विधानसभेची तयारी…..
संजय आ. काटे
शिवाजीराव बापु नागवडे या नावात फार मोठी ताकत होती व आजही आहे. ज्या माणसाने राजकारण व समाजकारण करताना कधीच आपल्या कुटुंबाकडे लक्षही दिले नाही त्याच ‘बापुं’च्या सुनबाई अनुराधा राजेंद्र नागवडे यांना उमेदवारी मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. एक महिला आमदार तालुक्याला मिळावी यासाठी सगळेच प्रयत्नशिल आहेत. पण बापुंच्या नंतर तरी त्यांच्या कुटुंबातील आमदार व्हावा, यासाठी आता कार्यकर्त्याला पेटून उठावे लागणार आहे….
घोड धरणासाठी संघर्ष, लाभक्षेत्रातील शेतीला पाणी मिळावे यासाठी संघर्ष, सहकारी कारखानदारी टिकविण्यासाठी संघर्ष असा संघर्षमय प्रवास केलेले कर्मयोगी म्हणजे शिवाजीराव नारायणराव नागवडे उर्फ बापु.. या व्यक्तीविषयी आजही श्रीगोंद्यासह अहिल्यानगर जिल्ह्यात एक आदराचे स्थान कायम आहे. त्यांच्या काळातील पिढी आता सुर्यास्ताकडे झुकली असली तरी, पुढच्या पिढीलाही बापु या नावाचे मोठे आकर्षण आहे. बापुंनी आयुष्यात कधीही अंगावर शिंतोडा उडू दिला नाही. त्यांच्यावर अनेक राजकीय टिका झाल्या तरीही त्यांनी स्वाभीमानी बाणा सोडला नाही. ताठ मानेने शेवटपर्यंत राहिलेल्या या नेत्याने शेतकऱ्यांसाठी आयुष्यभर हाडाची काडे आणि रक्ताचे पाणी केले. त्यांचे प्रमुख विरोधक राहिलेले विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्या सोबत टोकाचा राजकीय संघर्ष केला पण पातळी सोडून कधीच निर्णय घेतले नाहीत. दोन वेळा आमदार झाले पण अनेकवेळा लोकांनी त्यांना नाकारले. पण लोकहिताची कामे सोडली नाहीत. श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी कायमच तालुका कार्यक्षेत्र ठेवून सार्वजनिक विकासात हातभार लावला.
२०१४ मध्ये बापुंनी माघार घेत राहूल जगताप यांचा नवा चेहरा पुढे केला. कुंडलिकराव तात्या जगताप यांच्या जोडीने आमदार बबनराव पाचपुते यांचा त्याही वयात पराभव केला. या सगळ्या घडामोडीत बापुंचे कुटुंबाकडे दुर्लक्ष झाले हे नाकारता येत नाही. कुटुंबावरील प्रेम त्यांनी लोकांपुढे दाखविले नाही. पण मनातून त्यांची असणारी इच्छा आता पुर्ण करण्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांना हाती दांडा असणारा झेंडा घ्यावा लागणार आहे. अनुराधा नागवडे यांना भलेही वरिष्ट पातळीवर दुर्लक्षीत केले असले तरी कार्यकर्त्यांना तालुक्यातील नागवडे यांची ताकत दाखवून द्यावी लागणार आहे. त्यासाठी भले अपक्ष लढण्याची तयारी ठेवावी लागणार आहे. राजेंद्र नागवडे यांनी आता पत्नीसाठी नव्हे तर बापुंचे स्वप्न साकारताना, त्यांच्या कार्यकर्त्यांची एकजूट दाखवून देण्यासाठी सर्व पर्याय खुले ठेवावेत अशी अपेक्षा कार्यकर्तेही बाळगून आहेत….