जगताप यांच्याकडे जायचेय…. पण लोकसभेची आठवण ताजी….
संजय आ. काटे
लोकसभा निवडणूकीत श्रीगोंद्यातून खासदार नीलेश लंके यांना जे मताधिक्य मिळाले त्यात माजी आमदार राहूल जगताप यांचा मोठा वाटा आहे. आता विधानसभा निवडणूकीत विखे समर्थकांना जगताप यांच्याकडे जायचे आहे पण लोकसभा निवडणूकीत त्यांनी डाॅ. सुजय विखे यांना केलेला विरोध अजूनही ताजा आहे. त्यातच आमदार बबनराव पाचपुते यांनीही विखे यांच्या समर्थकांना प्रचारात सक्रिय करुन घेतले नाही. नागवडे हेही विरोधातच होते . या सगळ्या गोंधळात नेमके कुणाला पाठींबा द्यायचा या निर्णय घेताना विखे समर्थकांची गोची झाल्याचे लक्षात येत आहे.
श्रीगोंद्यात यंदा विधानसभा निवडणूकीत रंगत आली आहे. बहुतेक प्रमुख नेते रिंगणात आहेत. काही महिन्यांपुर्वीच लोकसभा निवडणूक झाली. तीत डाॅ. सुजय विखे पाटील यांच्याविरोधात खासदार नीलेश लंके यांना तालुक्यातून मोठे मताधिक्य मिळाले. त्याचे प्रमुख कारण महत्वाच्या नेत्यांनी विखे यांच्याविरोधात लंके यांचे केलेले काम हे होते. माजी आमदार राहूल जगताप हे त्यात आघाडीवर होते.
आता विखे यांच्या येथील समर्थकांना विधानसभेसाठी जगताप यांचाच पर्याय राहिला आहे. कारण पाचपुते यांनी लोकसभेला विखे यांची यंत्रणा पुर्णपणे बाजूला काढली होती. त्यांना प्रचाराच्या व्यासपिठावर सुध्दा येवू दिले नाही असा आरोप झाला होता. त्यामुळे या विखे समर्थकांची पाचपुते यांच्यावर नाराजी दिसते. त्यातच नागवडे यांनी जरी विखे यांचे काम केले असले तरी स्थानिक विखे समर्थकांचे व त्यांचे जमत नाही. त्यामुळे नागवडे यांच्या व्यासपिठावर ते जावू शकत नाहीत.
अण्णासाहेब शेलार हे विखे समर्थक मानले जातात पण त्यांच्याही व्यासपिठावर कुणी दिसत नाही.उलट जगताप यांच्यासोबत काही विखे समर्थक दिसत आहे. पण बहुतेक विखे समर्थकांना अजूनही राजकीय रस्ता सापडत नाही. त्यामुळे विखे हे नेमके कुणासोबत आहेत हे अजूनही अस्पष्टच आहे.