संजय आ. काटे
अहिल्यानगर जिल्ह्यातील सगळ्यांचे लक्ष लागून असलेल्या श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदारसंघातील फाईट अजूनही फिक्स होत नाही. भाजपाने डाॅ. प्रतिभा पाचपुते यांची उमेदवारी निश्चित करीत आघाडी घेतली. पण महाविकास आघाडीचे भिजत घोंगडे अजूनही तसेच आहे. राहूल जगताप की अनुराधा नागवडे हा निर्णय अजूनही पेडिंग पडला आहे. आज फैसला होण्याची शक्यता असल्याने सगळ्यांच्या नजरा मुबंईकडे लागल्या आहेत.
विधानसभा निवडणूक सुरु झाल्यावर महाविकास आघाडीत शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार राहूल जगताप व काँग्रेसचे घनशाम शेलार यांच्यात उमेदवारीसाठी रस्सीखेंच होती. त्याचवेळी भाजपाचे आमदार बबनराव पाचपुते, सुवर्णा पाचपुते व राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अनुराधा नागवडे यांच्यात महायुतीच्या उमेदवारीची चर्चा होती. पण काही दिवसात उलटे चक्रे फिरली आणि नागवडे यांनी अचानक अजित पवार यांच्या पक्षाकडे दुर्लक्ष करीत महाविकास आघाडीशी संधान साधले. त्यामुळे पाचपुते यांच्या उमेदवारीसाठी सोयीचे झाले. त्यातच त्यांच्या कुटुंबात कोण यावरची चर्चाही आता थांबली आहे. डाॅ. पाचपुते यांच उमेदवार हे निश्चित झाल्याने त्यांचे कार्यकर्ते प्रचाराला लागले आहेत. सुवर्णा पाचपुते आता बंडखोरी करतात की थांबतात हे पाहावे लागणार आहे.
दरम्यान महाविकास आघाडीत उमेदवारीसाठी वेगळीच स्पर्धा लागली आहे. स्थानिक पातळीवर ही उमेदवारी राहिली नसून शरद पवार, उध्दव ठाकरे, बाळासाहेब थोरात यांच्या कोर्टात ते ठरवले जाणार आहे. गेली काही दिवस मुबंईत जगताप व नागवडे गट फिल्डीग लावून आहे. तर घनशाम शेलार मुंबईत संपर्कात असले तरी मतदारसंघात जनसंपर्कात जास्त आहेत. जगताप यांच्या सोबत या लढाईत खासदार नीलेश लंके, पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके हे आहेत. तर नागवडे यांच्यासाठी शिवसेनेच उपनेते साजन पाचपुते हे खासदार संजय राऊत यांच्याकडे फिल्डींग लावून आहेत. विशेष म्हणजे राऊत यांनी श्रीगोंद्यात ‘खास’ लक्ष दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
महाविकास आघाडीची आज पहिली यादी येण्याची शक्यता आहे. त्यात श्रीगोंद्याचा समावेश असू शकतो असे सांगितले जाते. त्यामुळे जगताप, नागवडे की शेलार यातील कुणाला अधिकृत उमेदवारी मिळतेय हे पाहावे लागेल. शिवसेना साजन पाचपुते यांच्यासाठी आग्रही होण्याची शक्यता असली तरी साजन यांना नागवडे यांच्या हाती मशाल देण्याची खेळी खेळायची आहे. पण ऐनवेळी नेमके काय होतेय हे आत्ता सांगता येत नाही.
मलाच उमेदवारी- सगळ्यांचा दावा
**** महाविकास आघाडीची उमेदवारी मलाच मिळेल यात शंका नाही. साहेब सोबतीला आहेत असा दावा राहूल जगताप यांचा आहे.
**** महाविकास आघाडीची उमेदवारी आम्हाला मिळेल असा दावा नागवडे गट करीत आहे.
*** काँग्रेस पक्षाला मानणारा ता मतदारसंघ आहे. त्यातच नेत्यांवर विश्वास असल्याने आपण बिनधास्त आहोत असा दावा घनशाम शेलार यांचा आहे.