श्रीगोंद्याचा ‘सिंह’ ‘विक्रम’च. शांतपणे केलेली खेळी विरोधकांना समजलीच नाही.
संजय आ. काटे
विरोधकांनी मोठा आरडाओरडा केला, सोशल मिडीयावर उपहासात्मक टीकेची झोड उठवली. तालुक्यातील बहुतेक बडे नेते विरोधात होते. त्यातच आईची उमेदवारी त्यांच्या वाट्याला आली. वडील नेते असले तरी आजारी असल्याने घरच्या अडचणीही होत्या. पण गडी डगमगला नाही. शांतपणे विरोधकांचे डाव पाहत राहिला आणि आपले डाव सुप्तपणे टाकत राहिला. आज तोच तालुक्यात आमदार झाला आणि उद्याच्या राजकारणाची सगळी सुत्रे हाती घेत श्रीगोंद्याचा खरा सिंह आपणच आहोत हे दाखवून दिले आहे आमदार विक्रमसिंह बबनराव पाचपुते यांनी….
माजी आमदार राहूल जगताप, राजकारणातील एक बडे प्रस्थ असणाऱ्या अनुराधा नागवडे व माळी समाजाचे तगडे नेते अण्णासाहेब शेलार या तिघांना धूळ चारीत विक्रमसिंह पाचपुते यांनी ३६ हजार ७७३ मतांनी दणदणीत आणि तेवढाच सफाईदार विजय मिळवित ‘हम ही हैं किंग’ हेच दाखवून दिले.
आज सकाळपासून सुरु झालेल्या मतमोजणीत पहिल्या फेरीपासून लीड घेणाऱ्या पाचपुते यांनी विरोधकांना डोकेच वर काढू दिले नाही. नगर तालुक्यातील दोन्ही गटासह तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गटांत आघाडी घेत हा विजय मिळविला.
मावळते आमदार बबनराव पाचपुते यांच्या तालमीत तयार झालेल्या विक्रमसिंह यांनी बंधू प्रतापसिंह, आई प्रतिभा पाचपुते यांच्या खांद्यावरील हाताला सार्थ ठरवित आज दिमाखदार विजय मिळविला.
विधानसभा निवडणूक लागल्यानंतर महाविकास आघाडीत वाद सुरु झाले. त्याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे लोकसभा निवडणूकीत डाॅ. सूजय विखेपाटील यांचा पराभव व खासदार नीलेश लंके यांच्या विजयात श्रीगोंदेकरांनी बजावलेली भूमिका होते. लंके यांना श्रीगोंद्याने मोठे मताधिक्य दिल्याने यंदा आमदारही आमचाच होणार या अविर्भावात असणाऱ्या आघाडीच्या प्रत्येक नेत्याला आमदार होण्याचे स्वप्न पडले होते. राहूल जगताप व घनशाम शेलार यांच्या जोडीला अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत असणाऱ्या अनुराधा नागवडे याही आल्या. आघाडीतून उमेदवारीसाठी सगळ्यांनीच प्रयत्न सुरु केले. त्यातच शिवसेनेने नागवडे यांना उमेदवारी दिल्यावर नाराज झालेल्या जगताप यांनी अपक्ष उमेदवारी करण्याचे जाहीर करीत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. सगळेच लढायला लागल्यावर अण्णासाहेब शेलार हेही मागे राहिले नाहीत.
एकास एक लढत होत नाही हे लक्षात येताच पाचपुते यांनी त्यांचे आडाखे बांधले. भाजपाने जरी प्रतिभा पाचपुते यांची उमेदवारी जाहीर केली असली तरी पाचपुते कुटुंब कायमच देवेंद्र फडणवीस यांच्या ‘गुड बुक’ मध्ये राहिलेले आहे. त्यामुळे ती उमेदवारी बदलून विक्रमसिंह यांना देण्यात अडचण आली नाही. एक तरुण चेहरा दिल्यावर काही माध्यमांनी त्यांची बदनामी सुरु केल्यावर विक्रमसिंह यांनी निवडणूक पॅटर्न बदलला. माळी समाजाची मते हा पाचपुते कुटुंबाचा आधार असल्याचे जाणकारांचे म्हणणे होते व त्यामुळे शेलार यांची उमेदवारी त्यांच्यासाठी डोकेदुखी असल्याचे जाणवत होते. त्यामुळे पाचपुते यांनी कुठेही वाच्यता न करता सुप्तपणे थेट मतदारांमध्ये फिल्डींग लावत काम फत्ते करुन घेतले. सरकारच्या योजना विशेष करुन लाडकी बहिणीला लोकांमधून प्रतिसाद मिळतोय हे लक्षात घेतले.
त्याचवेळी विरोधकांची मते विभागली जाणार असल्याने त्याचाही फायदा पाचपुते यांना मिळणार होता. पण हे विरोधकांच्या लक्षात आले नाही. पाचपुते यांनी त्यांचा प्रचार शांतपणे करीत टाकलेला प्रत्येक डाव त्यांना साथ देवून गेला आणि ३६ हजार ७७३ मतांनी विरोधकांना चारीमुंड्या चीत करीत नवा आमदार म्हणून विक्रमसिंह पाचपुते यांनी सुत्रे हाती घेतली.
२००९ ला जे घडले तेच आजही घडले….
२००९ मध्ये बबनराव पाचपुते हे राष्ट्रवादीकडून उमेदवार होते. त्यावेळी भाजपाकडून राजेंद्र नागवडे व अपक्ष म्हणून अण्णासाहेब शेलार उभे राहिले होते. त्याहीवेळी माळी समाजाची मते पाचपुते यांच्याविरोधात जावून त्यांचा पराभव करण्याचा डाव आखला गेला होता. पण तसे घडले नाही. उलट पाचपुते सुमारे २७ हजार विक्रमी मतांनी जिंकले. आजही तेच घडले आणि विक्रमसिंह यांचा विजय झाला. त्यामुळे तालुक्यात जातीय समिकरणे केवळ कागदावर राहतात व सगळे गुण्यागोविंदाने एकत्र असतात हेच पुन्हा सिध्द झाले.