संजय आ. काटे
महाविकास आघाडीतून तुतारी चिन्हावर राहूल जगताप हेच उमेदवार असतील असे ठणकावून सांगणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवसेनेपुढे झुकल्याचे दिसले. पण महाविकास आघाडीकडून मशाल हाती घेवून मैदानात उतरलेल्या अनुराधा नागवडे यांच्यासोबत शरद पवार यांची राष्ट्रवादी दिसत नाही. किंबहुना राहूल जगताप यांच्याच पाठीवर पवारांचा हात असल्याचे संकेत असल्याने निवडणूकीत नेमके काय होतेय याकडेच लक्ष आहे.
महाविकास आघाडीतून तुतारी हे चिन्ह घेण्यासाठी पाच दिवस मुबंईत तळ ठोकणाऱ्या राहूल जगताप यांच्या हाती निराशा आली. त्याचवेळी शिवसेनेचे उपनेते साजन पाचपुते यांच्या मध्यस्थीने अनुराधा नागवडे यांनी आघाडीची उमेदवारी मिळवली. पण त्यामुळे हताश झालेल्या जगताप यांनी सहानुभुतीच्या बळावर अपक्ष उमेदवारी करीत आव्हान उभे केले.आता मतदारंसघात भाजपचे विक्रम पाचपुते, आघाडीच्या अनुराधा नागवडे, वंचितचे अण्णासाहेब शेलार व अपक्ष असणारे राहूल जगताप यांच्यात चौरंगी लढत रंगली आहे.
काल शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची मोठी सभा झाली. तीत काँग्रेसचे बाळासाहेब थोरात उपस्थितीत होते. पण त्याचवेळी राष्ट्रवादीचे खासदार नीलेश लंके, पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्यासह प्रमुख नेते गैरहजर होते. खासदार फौजीया खान जरी आल्या असल्या तरी त्यांचा थेट परिमाण श्रीगोंद्याच्या मतदारांवर होईल असे वाटत नाही. आमदार रोहित पवार हेही आले नाहीत. वांगदरी येथील नागवडे यांच्या प्रचारसभेत ते येणार असल्याचे सांगण्यात आले पण ते तेथेही आले नाहीत. त्यांच्या सभेसाठी जामखेडला खासदार संजय राऊत आल्यावर रोहित पवार यांनी श्रीगोंद्यात नागवडे यांना मतदान करण्याचे आव्हान करणारा एक व्हिडीओ सादर केला. पण त्याव्यतिरिक्त पवार गटाने नागवडे यांच्यासाठी काहीही केलेले नाही. विशेष म्हणजे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे नागवडे यांचे जवळचे नातेवाईक आहेत. अजून तेही त्यांच्यासाठी काही करु शकलेले नसल्याचे दिसते.
उलट शरद पवार यांचा फोटो वापरुन जोरदार प्रचार करणाऱ्या राहूल जगताप यांच्यावर कुठलीही कारवाईच काय, विरोधात पक्षाकडून निरोपही आलेला नसल्याचे समजते.या सगळ्या राजकीय घडामोडी पाहता, शरद पवार यांच्यासह त्यांचा पक्षच राहूल जगताप यांच्या विजयासाठी राबतोय की अशी शंका येवू लागली आहे. अनुराधा नागवडे व जेष्ठनेते बाबासाहेब भोस यांनी राहूल जगताप हे भाजपाचेच अनाधिकृत उमेदवार असल्याचे सांगण्याचा प्रयत्न चालविला असला तरी तो लोकांनाच काय राष्ट्रवादीलाही पटत नसल्याचे घडामोडींवरुन लक्षात येत आहे. त्यामुळे श्रीगोंद्यातील ही लढत महाविकास आघाडीची मैत्रीपुर्ण लढत तर नाही ना ही शंका घेण्यास वाव आहे. जाहीर प्रचारास आता जास्त दिवस राहिले नसल्याने राष्ट्रवादीचे बडे नेते जर श्रीगोंद्यात आले नाहीत तर त्याचा मोठा फायदा जगताप यांना होणार आहे.