संजय आ. काटे
श्रीगोंद्यात तुतारीचा खुप गाजावाजा झाला पण ऐनवेळी महाविकास आघाडीच्या हाती मशाल आली. तुतारी मिळेल या आशेवर व शरद पवार यांच्या भरोशावर बसलेले राहूल जगताप आता रोड रोलर घेवून संधी शोधत आहेत. अपक्ष उमेदवार जगताप यांच्यासह महाविकास आघाडीच्या उमेदवार अनुराधा नागवडे या दोघांच्याही बॅनरवर ‘साहेब’ असले तरी ते नेमके कुणाच्या सोबतीला आहेत हे मतदारांना समजत नाही.
लोकसभा निवडणूकीत तुतारीची जी क्रेझ होती ती कायम होती, त्याचा फायदा महाविकास आघाडीला उठविता आला नाही. लोकसभा निवडणूकीत खासदार नीलेश लंके यांना तुतारीने फाॅर्मात आणले. तीच तुतारी विधानसभेला आपल्या हाती असेल या भावनेने लंके यांच्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या माजी आमदार राहूल जगताप यांच्यावर पक्षाने अन्याय केला. जगताप यांच्यासोबत ना ‘साहेब’ आले, ना लंके ना जयंत पाटील राहिले. शेवटी शिवसेनेने बाजी मारली आणि अनुराधा नागवडे यांच्या हाती मशाल आली आणि तुतारी गायब झाली.
पण आता विधानसभा निवडणूक अंतीम टप्याकडे जात आहे. भाजपाचे विक्रम पाचपुते, सेनेच्या अनुराधा नागवडे, अपक्ष राहूल जगताप आणि ‘वंचित’चे अण्णासाहेब शेलार यांच्यात रंगतदार लढत होत आहे. नागवडे व जगताप या दोघांच्याही बॅनरवर शरद पवार यांचा फोटो आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार असल्याने नागवडे यांच्या बॅनरवरील फोटोबाबत कुणाचेही दुमत नाही पण जगताप यांनीही फोटो वापरल्याने शरद पवार नेमके कुणासोबत आहेत याबद्दल मतदारांचा अवमेळ होतोय. दोन्ही बाजूंनी साहेब आमच्याच सोबत असल्याचा दावा होत असला तरी त्याला अजूनही दुजोरा मिळत नाही.
कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार हे नागवडे यांच्या सभेसाठी वांगदरी येथे येणार होते. पण ते आले नाहीत. पण आज त्यांचा एक व्हिडीओ सोशल मिडीयात व्हायरल झाला. त्यानूसार त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार अनुराधा नागवडे यांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचे खासदार संजय राऊत आज रोहित पवार यांच्या सभेसाठी जामखेड येथे आले होते. त्यानंतर पवार यांचा हा व्हिडीओ पुढे आला आहे. आता ‘साहेब’ कुणासोबत आहेत हेही पुढे आले म्हणजे पवारांची स्ट्रॅटर्जी मतदारांना कळेल.