साजन पाचपुते ठरले ठाकरेंच्या सभेतील हिरो
संजय आ. काटे
गळ्यात पडणारी उमेदवारीची माळ दुसऱ्याच्या गळ्यात टाकण्याचे धारिष्ट्य दाखविणाऱ्या शिवसेनेचे उपनेते साजन पाचपुते यांचे आज शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी केलेले कौतुक उद्याच्या राजकारणाची दिशा दाखविणारे आहे. अनुराधा नागवडे यांच्या प्रचारसभेसाठी आलेल्या ठाकरे यांनी साजन यांच्याबद्दल काढलेले गौरवोद्गार खुप काही सांगून जाणारे असून साजन पाचपुते यांची नागवडे यांच्यासाठी सुरु असणारी राजकीय स्ट्रॅटर्जी निकालाची दिशा ठरविणारी असल्याचे दिसते.
महाविकास आघाडीच्या उमेदवार अनुराधा नागवडे यांच्या प्रचार सभेसाठी उध्दव ठाकरे श्रीगोंद्यात येवून गेले. ते पहिल्यांदाच श्रीगोंद्यात येणार असल्याने त्यांच्याबद्दल उत्सुकता होती. त्यातच शिवसेनेने पहिल्यांदाच नागवडे यांच्या रुपाने मतदारसंघात मोठे आव्हान उभे केल्याने त्यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष होते. मूळात शरद पवार याच्या पक्षाकडून ही जागा हिसकावून घेवून आव्हान उभे करणे हेही महत्वाचे होते. साजन पाचपुते यांनी ज्या पध्दतीने नागवडे यांना ही उमेदवारी मिळवून दिली त्याचवेळी त्यांच्यात व ठाकरे कुटुंबातील जवळीक लक्षात आली होती.
ठाकरे हे कुणाचेही नाहक कौतुक करीत नाहीत असे बोलले जाते. पण आज व्यासपिठावर उध्दव ठाकरे यांनी ज्या पध्दतीने साजन पाचपुते यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली ती भविष्यातील राजकीय भूमिका स्पष्ट करीत होती. ‘आमची उमेदवारी साजन यांनाच होती, पण त्यांनी ती स्वत:हून अनुराधा नागवडे यांनी देण्याची विनंती केली ,हे सगळ्यांनाच जमत नाही’ असे सांगणाऱ्या उध्दव ठाकरे यांच्याकडे पाहणाऱ्या साजन यांच्या मातोश्री सुनंदा पाचपुते यांच्या चेहऱ्यावरील समाधान खुप काही सांगून गेले.
आजच्या सभेनंतर नागवडे यांनी विरोधकांना आव्हान दिले आहे. नागवडे यांची बहुतेक सगळी सुत्रे सध्या साजन पाचपुते यांच्या हाती असल्याने विरोधकांनाही पाठीमागे वळून पाहावे लागणार आहे. अन्यथा बरेच काही घडून गेलेले असेल.
पाचपुतेंकडे सदाअण्णा नाहीत आणि नागवडेंकडे साजन आहे…
सध्याच्या निवडणूकीत शिवाजीराव (बापु) नागवडे, कुंडलिकराव (तात्या) जगताप, सदाशिव ( अण्णा) पाचपुते, प्रा. तुकाराम दरेकर सर या नेत्यांनी उणिव विशेषकरुन जाणवते. नागवडे, जगताप यांना तर ती जाणवतच आहे पण त्यातच पाचपुते गटाला सदाअण्णांची उणिव आता जास्त जाणवत असेल. कारण त्यांचायाकडे अण्णांची गैरहजेरी तर आहेच पण समोर विरोधकांच्या म्हणजे नागवडे यांच्या तंबून अण्णांचे पुत्र साजन हे बाह्या मागे सारुन कामाला लागले आहेत. नागवडे यांचे निवडणूकीतील मास्टर माईंडच ते असल्याने पाचपुते यांच्यासाठी धोक्याची घंटा ठरु शकते.