संजय राऊत यांचा गंभीर आरोप
आमच्यावर आरोप करणाऱ्या राहूल जगताप यांनी शेतकऱ्यांचे पैसे बुडविले आहेत. अशा लोकांना महाविकास आघाडी उमेदवारी कशी देणार. आता त्यांचा रिमोट देवेंद्र फडणवीस यांच्या हाती असून फडणवीस जगताप यांना ऑपरेट करीत असल्याचा आरोप करीत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी करतानाच, शरद पवार हे अनुराधा नागवडे यांच्याच पाठीशी असल्याचा दावा केला.
वांगदरी येथे महाविकास आघाडीच्या उमेदवार अनुराधा नागवडे यांच्या प्रचाराचा प्रारंभ करताना राऊत बोलत होते. ते म्हणाले, साजन पाचपुते यांच्यासाठी आम्ही लढाई केली. साजन यांना वर्षांपुर्वीच सांगितले की होते , ‘की तुला श्रीगोंदा लढायचा आहे’. त्यावेळी साजनची तयारी नव्हती. आधी उमेदवारी मग तयारी ही शिवसेनेची खासियत आहे. आम्ही साधे कार्यकर्ते आहोत. सगळे मोठे नेते काँग्रेस , राष्ट्रवादीत असतात. आम्ही साधे शिवसैनिक आहोत.
राऊत म्हणाले, बाळासाहेबांची पुण्याई आहे की साधा कार्यकर्ताही आमदार झाला. पानटपरीवर बसलेला आमदार, कोंबडीचोर मुख्यमंत्री केला. शिवसेना अशीच आहे. सेनेत कारखाना, शाळा, सुतगिरणी, बँक काहीच नसते. पण आमचे आत्ताही १८ खासदार आहेत. श्रीगोंद्यातील दोन कारखानदारही आमच्यासोबत आहेत. ही शिवसेना आहे, सरळमार्गी काम करणाऱ्यांचा पक्ष आहे. सत्तेसाठी आम्ही नव्हे तर आमच्यासाठी सत्ता आहे हे बाळासाहेबांचे बोल आहेत. साजन तुम्हीही चिंता करु नका, उध्दव ठाकरे यांनी त्यांची जबाबदारी घेतली आहे.
राहूल जगताप यांनी काहीही नसताना बंडखोरी केली. देवेंद्र फडणवीस हे त्यांना ऑपरेट करतात. वीष कालविण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. जगताप आमच्या नेत्यांचे फोटो लावून मते मागतात. डोनाल्ड ट्रम्प यांचाही फोटो लावा की….लोकांचे पैसे बुडवले ,तुम्हाला लोक गावात येवू देत नाहीत, ते उमेदवारी कशी मागू शकतात असा सवालही राऊत यांनी केला.
राऊत पुढे म्हणाले, शरद पवार हे अनुराधा नागवडे यांच्याच पाठीशी आहेत हे खुद्द पवार यांनीच मला सांगितले. महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार या अनुराधा नागवडे याच आहेत आणि त्याच जिंकणार आहेत.
बापु साडेसात वर्षे सत्तेत आणि पाचपुते चाळीस वर्षे सत्तेत आहेत. सत्तेचे अजीर्ण झाल्याने साजन आपल्यासोबत आल्याचे सांगत आमदार बबनराव पाचपुते यांना चिमटा काढला.
अनुराधा नागवडे यांना एक संधी द्या, आम्ही विकास काय असतो हे दाखवून देवू असे आवाहन राऊत यांनी केले.