पवार, गांधींचे छायाचित्रे वापरुन प्रचार
श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार राहूल जगताप यांच्या सोशल मिडीयातील प्रचार पोस्टरवर काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी व राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार )अध्यक्ष शरद पवार यांचे छायाचित्रे वापरली जात आहेत. जगताप हे अपक्ष असून त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार असतानाही ते या नेत्यांचे छायाचित्रे वापरत असल्याने त्यांना नोटीस निघणार असल्याची माहिती आहे.
श्रीगोंद्यात विधानसभा निवडणूकीतील प्रचार जोरात सुरु झाला आहे. महायुतीचे विक्रमसिंह पाचपुते, महाविकास आघाडीच्या अनुराधा नागवडे, वंचितचे अण्णासाहेब शेलार, व अपक्ष असणारे राहूल जगताप यांच्यात सध्या तरी मुख्य लढत दिसत आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार अनुराधा नागवडे यांच्या प्रचार पत्रकांवर राहूल गांधी, शरद पवार, उध्दव ठाकरे या प्रमुख नेत्यांचे छायाचित्रे आहेत. तथापि राहूल जगताप हेही त्यांच्या सोशल मिडीयातील प्रचारात गांधी, पवार यांच्यासह बाळासाहेब ठाकरे, शिवाजीराव नागवडे यांचीही छायाचित्रे वापरत असल्याने महाविकास आघाडीच्या प्रमुखांनी त्यांच्या या प्रचार पध्दतीवर आक्षेप घेतला आहे. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्रीगोंद्यात उभ्या असतानाही जगताप हे आघाडीतील नेत्यांचे छायाचित्रे वापरुन मतदारांना भुलविण्याचे काम करीत असल्याचा त्यांचा आरोप आहे. राहूल गांधी व शरद पवार यांचे छायाचित्रे वापरणे बंद करण्यासाठी आता जगताप यांच्याविरुध्द रितसर नोटीस पाठविण्यात येणार असल्याची माहिती आहे. तसे झाल्यास जगताप यांना ही छायाचित्रे वापरता येणार नाहीत.