विधानसभा लढण्यासाठी अनेकांची मोर्चेबांधणी, मध्यस्थांची रेलचेल वाढली
संजय आ.काटे
श्रीगोंदा, ता. २५ : कधी नव्हे एवढे इच्छूक यदांच्या विधानसभेला समोर येत आहेत. जो कोणी भेटेल तो म्हणतोट विधानसभेला मी पण इच्छूक आहे. यातील बहुतेक मैदानात लढण्यासाठी नव्हे तर स्वत:चे राजकीय महत्व अधोरेखित करण्यासाठी इच्छूक असल्याचे सांगतोय का असा प्रश्नही पुढे येतोय. त्यातच काही नेत्यांच्या जवळ असणाऱ्या निष्ठावंतांना मध्यस्थांची भूमिका बजावावी लागणार असल्याचे अशा लोकांची रेलचेल वाढली आहे.
आमदार बबनराव पाचपुते अनेक महिन्यांपासून आजारी आहेत. त्यामुळे यावेळी आपण आमदार होणार हे स्वप्न बाळगून काहींनी पत्ते टाकण्यास सुरुवात केली आहे. प्रमुख नेत्यांसह दुसऱ्या फळीतील व ज्यांचा ठराविक भागातच संपर्क आहे त्यांनाही अशी स्वप्ने पडू लागल्याने काही तरी वेगळेच शिजतेय हे सामान्यांच्या लक्षात येतेय.
आमदार बबनराव पाचपुते अथवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती, माजी आमदार राहूल जगताप, अनुराधा नागवडे, घनशाम शेलार, अण्णासाहेब शेलार, साजन पाचपुते, बाबासाहेब भोस, टिळक भोस,सुवर्णा पाचपुते, दत्तात्रेय पानसरे, बाळासाहेब नाहाटा, आपचे राजेंद्र नागवडे, राजेंद्र म्हस्के, शरद नवले, निवास नाईक असे विधानसभेसाठी चर्चेतील चेहरे आहेत. हे सगळे नेते श्रीगोंदा तालुक्यातील आहेत, नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील व वाळकी हे दोन जिल्हा परिषद गट आहेत तेथे कोणी प्रमुख चर्चेत नसले तरी श्रीगोंद्यातील डझनभर नेत्यांची संख्या त्याभागातही तडगा उमेदवार पुढे येवू शकतो.
तालुक्यातील अथवा मतदारसंघात अनेक प्रश्नांची सोडवणूक झाली व अजून अनेक प्रश्न समोर आहेत. त्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी इच्छूक वाढले आहेत असेच म्हणावे लागेल. पण ते सामान्यांना मान्य होत नाही. मतदारसंघाचे कुणाला घेणे-देणे नाही, जो तो आपले वर्चस्व सिध्द करायला निघाला असे बोलले जाते. त्यातच अनेकांना प्रत्यक्षात उमेदवारी करायचीच नाही, तडजोड मग ती राजकीय असो अथवा वेगळी करुन मोकळे व्हायचे आहे. यातील काहींचे उपद्रवमुल्य नको म्हणून नेते त्यांच्याशी सल्लामसलत करु लागलेत.
काही नेत्यांच्या जवळचे लोक या निवडणूकीत मध्यस्थ म्हणून पुढे येतील. अर्थात त्यांचा हेतू नक्कीच शुध्द असेल यात दुमत नाही. इच्छूक असणे गुन्हा नाही पण प्रत्येकाने एकदा लोकांना त्यांची खरी व प्रामाणिक भूमिका सांगितली तर निवडणूकीत राजकीय रंगत येईल, अन्यथा निवडणूकीएवढा उमेदवारांचा खर्च तडजोडीतच जाईल अशीही भिती व्यक्त होवू लागली आहे.