युतीचा धर्म पाळणार की, मैत्री निभावणार….
संजय आ. काटे
जिल्हा सहकारी बँकेचे माजी संचालक दत्तात्रेय पानसरे व बाजार समिती महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब नाहाटा यांची श्रीगोंद्यातील राजकीय भूमिका अजूनही अस्पष्ट आहे. ते निवडणूकीत नेमके कुणासोबत आहेत हे कुणालाच काय त्यांनाही सांगता येणार नाही. हे दोघे तालुक्याच्या राजकारणातील पॅटर्न म्हणून ओळखले जात असल्याने ते काय भूमिका घेणार याची मतदारसंघाला उत्सुकता आहे.
सध्या दत्तात्रेय पानसरे व बाळासाहेब नाहाटा हे दोघेही राष्ट्रवादी (अजित पवार ) काँग्रेसमध्ये आहेत. तालुक्यात महायुतीचे विक्रम पाचपुते हे उमेदवार आहेत. वास्तविक पाहता पानसरे व नाहाटा यांनी त्यांचे काम करणे म्हणजे युती धर्म पाळणे असा होईल. पण हे दोघेही त्यांच्या यंत्रणेत नाहीत. त्यातच पाचपुते यांच्या समोर महाविकास आघाडीच्या अनुराधा नागवडे , वंचितचे अण्णासाहेब शेलार व अपक्ष राहूल जगताप हे या दोघांशी संबधीत उमेदवार आहेत.
विधानसभा निवडणूक आता दहा दिवसांवर आली असतानाही पानसरे व नाहाटा या जोडगोळीने त्यांचे पत्ते ओपन केलेले नाहीत. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अनुराधा नागवडे यांना काँग्रेसमधून राष्ट्रवादीत प्रवेश करण्यात या दोघांची भूमिका महत्वाची ठरली होती. पण नागवडे यांनी आता शिवसेना उपनेते साजन पाचपुते यांच्या माध्यमातून शिवसेना ठाकरे गटात प्रवेशही केला आणि मशालही हाती घेतली. पण पानसरे व नाहाटा हे नागवडे यांच्यासोबत असल्याचे बोलले जात असले तरी त्यांची भूमिका अजूनही गुलदस्त्यातच आहे.
समजलेल्या माहितीनूसार, ते उद्या सोमवारी त्याबाबत निर्णय घेणार आहेत. या दोघांची सध्या कोण विजयाच्या जवळ आहे याची चाचपणी सुरु असल्याचे समजते व त्यानूसार ते निर्णय घेतील असे त्यांचे जवळचे कार्यकर्ते सांगत आहेत. या दोघांचा निर्णय पाठींबा मिळणाऱ्या उमेदवासाठी महत्वाचा असल्याने पानसरे व नाहाटा यांच्या निर्णयाची राजकीय कार्यकर्त्यांना उत्सुकता आहे. अण्णासाहेब शेलार व या दोघांची जवळीक जास्त आहे. पण नाहाटा यांची जगताप यांच्याशी तर पानसरे यांचे जवळपास सगळ्याच नेत्यांशी चांगले संबध आहेत. त्यामुळे त्यांच्या निर्णयावर बरीच राजकीय गणिते अवलंबून मानली जातात.