संजय आ. काटे
श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती आहे. त्यांनी हा राजीनामा आपल्या नेते माजी आमदार राहूल जगताप यांच्याकडे सुपूर्त केला असून, जगताप यांची या संदर्भातील भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, लोखंडे यांचा राजीनामा मंजूर केल्यास आमदार विक्रम पाचपुते आणि शिवसेना नेते राजेंद्र नागवडे यांच्या गटाकडून जगताप गटाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे लोखंडे यांचा राजीनामा थांबविण्यात येण्याची शक्यता आहे.
राजकीय पार्श्वभूमी आणि सत्तासमीकरणे
श्रीगोंदा बाजार समितीची निवडणूक सुमारे दोन वर्षांपूर्वी झाली. त्या वेळी माजी आमदार राहूल जगताप यांच्या गटाने ११ जागा तर विरोधी पाचपुते-नागवडे गटाने ७ जागा जिंकल्या होत्या. पाचपुते आणि नागवडे एकत्र असतानाही जगताप यांनी मिळवलेले यश राजकीय वर्तुळात मोठा धक्का मानले गेले.
सभापती-उपसभापती निवडीत मात्र शिवसेनेचे उपनेते साजन पाचपुते यांनी विरोधी गटाला मदत केली, त्यामुळे लोखंडे यांच्या सभापतीपदाला अडथळा निर्माण झाला. मात्र, राजकीय कौशल्य वापरून जगताप यांनी लोखंडे यांना सभापती आणि मनीषा मगर यांना उपसभापती पद मिळवून दिले.
सत्तासमीकरणात बदल
यादरम्यान, अनेक राजकीय उलथापालथी झाल्या. लोकसभा निवडणुकीत राहूल जगताप यांनी विद्यमान खासदार नीलेश लंके यांना मदत करून श्रीगोंद्यात स्वतंत्र सत्ता स्थापन करण्याचे संकेत दिले. मात्र, विधानसभा निवडणुकीत पाचपुते-नागवडे-जगताप-शेलार यांच्या चौरंगी लढतीत विक्रम पाचपुते विजयी झाले.
राज्यात भाजप महायुतीची सत्ता आल्याने जगताप आणि नागवडे हे बॅकफूटवर गेले आहेत. बाजार समिती निवडणुकीत लोखंडे यांचा कार्यकाळ निश्चित करण्यात आला होता, तो आता पूर्ण झाल्याने त्यांनी राजीनामा सादर केला आहे.
पुढचा सभापती कोण?
लोखंडे यांचा राजीनामा मंजूर झाल्यास पुढील सभापती कोण होईल, याबाबत अनिश्चितता आहे. सध्याचे बहुमत जगताप गटाकडे असले तरी पाचपुते-नागवडे गट एकत्र आल्यास समीकरणे बदलू शकतात.
विक्रम पाचपुते यांच्या राजकीय निर्णयांचा अंदाज बांधणे कठीण असल्याने जगताप हा राजीनामा मंजूर करण्याचा निर्णय घेतात का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.
नवा राजकीय डाव?
मिळालेल्या माहितीनुसार, अतुल लोखंडे एका सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत आणि लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे. जर त्यांनी वेगळा निर्णय घेतला, तर ती जगताप यांचीच खेळी ठरेल, असे बोलले जात आहे.