श्रीगोंद्यात विरोधकांच्या निष्क्रियतेमुळे आमदारांना मिळतोय फ्री हँड

  • संजय आ. काटे 

श्रीगोंदा तालुक्यात विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल झाला आहे. निवडणुकीपूर्वी आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान जोशात असलेले विरोधक सध्या निष्क्रिय झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे नवनिर्वाचित आमदार विक्रम पाचपुते यांना खुला वाव मिळाल्याने त्यांचे काम वेगाने सुरू आहे. मात्र, विरोधकांनी वेळेत सावधगिरी बाळगली नाही तर भविष्यात आमदारांना रोखणे कठीण होईल, हे कार्यकर्त्यांना समजत असले तरी त्यांच्या नेत्यांना अद्याप उमगलेले नाही.

  • श्रीगोंद्याच्या राजकारणाला मोठी कलाटणी

लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात नाराजी असलेल्या मतदारांनी महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांना पाठिंबा दिला. मात्र, विधानसभेत हेच मतदार भाजपच्या बाजूने वळले आणि विक्रम पाचपुते यांनी 38,000 हून अधिक मताधिक्याने विजय मिळवला. हा निकाल वरकरणी मतविभाजनाचा परिणाम वाटला तरी प्रत्यक्षात हे अर्धसत्य असल्याचे जाणकारांचे मत आहे.

लोकसभेला डॉ. सुजय विखे यांच्याविरोधात असंतोष दिसून आला, पण त्याचवेळी खासदार लंके यांनी तालुक्यासाठी कोणतेही ठोस कार्य न केल्याने मतदार संभ्रमित होते. याउलट, केंद्राच्या विकास योजना प्रत्यक्षात राबवणाऱ्या डॉ. विखेंना नाकारण्यात आले. तसेच, माजी मंत्री बबनराव पाचपुते आणि विद्यमान आमदार विक्रम पाचपुते यांची मतदारांनी लोकसभेत दखल घेतली नाही, ही बाबही महत्त्वाची ठरली.

महाविकास आघाडीच्या रणनीतीचा फसलेला प्रयोग

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या चुकीच्या रणनीतीचा फटका बसला. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी श्रीगोंद्याची जागा अडचणीत आणल्याचा आरोप होत आहे. शिवसेनेचे तालुक्यात कोणतेही ठोस अस्तित्व नसतानाही अनुराधा नागवडे यांना उमेदवारी देण्यात आली, तर माजी आमदार राहुल जगताप यांच्याकडून उमेदवारी काढून घेतली गेली. परिणामी, मतविभाजन होऊन भाजपला मोठे यश मिळाले. जर राष्ट्रवादीने योग्य उमेदवार निश्चित केला असता, तर निकाल वेगळा लागू शकला असता.

विरोधकांचे नेतृत्व कमकुवत आणि निष्क्रिय

विधानसभा निवडणुकीत नागवडे तिसऱ्या स्थानी गेले, तर अपक्ष उमेदवार राहूल जगताप दुसऱ्या स्थानावर आले. त्यामुळे विरोधी पक्षनेते म्हणून जगताप पुढे येण्याची शक्यता होती. मात्र, सध्या ना राहूल जगताप सक्रिय आहेत, ना राजेंद्र नागवडे. त्यामुळे तालुक्यात विरोधक अस्तित्वहीन झाल्याचे चित्र आहे. त्यातच, राजकीय वर्चस्व राखण्यासाठी त्यांना भाजपची भीती वाटत आहे. त्यांचे कारखाने हे राजकीय समीकरणांचे केंद्रबिंदू असल्याने ते सत्तेच्या जवळ राहण्याचा प्रयत्न करत असले, तरी सत्ताधारी पक्ष त्यांना दूर ठेवत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आमदार विक्रम पाचपुते आघाडीवर

विरोधकांच्या निष्क्रियतेचा सर्वाधिक फायदा आमदार विक्रम पाचपुते यांना झाला आहे. त्यांनी निवडणुकीनंतर लगेचच तालुक्यातील प्रश्न हाताळण्यास सुरुवात केली असून, त्यांचा कामाचा झपाटा पूर्वीच्या बबनराव पाचपुते यांची आठवण करून देतो. विधानसभेत प्रभावीपणे आपली बाजू मांडण्याची त्यांची शैली लक्षवेधी ठरत आहे. जर विरोधकांनी वेळीच सावध भूमिका घेतली नाही, तर आगामी काही वर्षांत पाचपुते हे तालुक्यातील प्रमुख राजकीय चेहरा म्हणून उदयास येतील. त्यांच्या नेतृत्वाखाली विकासकामे वेगाने होत असल्याने जनतेत त्यांच्याबद्दल सकारात्मक भावना निर्माण होत आहे.

विरोधकांसाठी अजूनही संधी

तालुक्यातील अनेक प्रलंबित प्रश्न असूनही विरोधक त्यावर आवाज उठवण्यास अपयशी ठरत आहेत. ‘जनतेने आम्हाला नाकारले’ या भावनेत ते अडकले आहेत, मात्र लोकांनी त्यांना एकत्रित जास्त मते दिली होती, हे ते सोयीस्करपणे विसरत आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण होत आहे.

जर विरोधकांनी वेळीच आत्मपरीक्षण केले नाही आणि जनतेचे प्रश्न घेऊन पुढे आले नाहीत, तर आगामी काळात तालुक्यात विरोधक नावालाच उरतील आणि सत्ता भाजपच्या हातातच राहील. विरोधकांनी लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी पार पाडली नाही, तर भविष्यात त्यांची जागा टिकवणे कठीण होईल, हे निश्‍चित!