विक्रमसिंह पाचपुतेच उमेदवार
संजय आ. काटे
Shrigonda Political News श्रीगोंदा, ता. २० ऑगस्ट २०२४ : विधानसभेतील अनुभवी आमदार बबनराव पाचपुते ( Babanrao Pacchpute) यांची तब्बेत काही वर्षात बिघडली आहे. यंदाही तेच उमेदवारी करतील असा दावा त्यांचे कुटुंबिय करीत असले तरी त्यांचे थोरले पुत्र विक्रमसिंह हेच त्यांचे वारसदार ठरल्याचे दिसते. भाजपच्या महत्वाच्या नेत्यांच्या ते मर्जीत असल्याने पक्षही त्यांच्याकडेच महायुतीचा उमेदवार पाहत असून त्यांना तयारीसाठी हिरवा कंदील मिळाला आहे.
१९८० पासून प्रत्येक विधानसभा निवडणूक लढवून राज्याच्या राजकारणात वेगळा दबदबा निर्माण केलेले आमदार बबनराव पाचपुते यावेळी कदाचित थांबतील असे दिसते. अर्थात दरवेळी त्यांनी वेगळा धक्का दिला असल्याने कुणीही खात्रीपुर्वक सांगू शकत नसले तरी त्यांची तब्बेत मात्र त्यांना आता निवृत्तीचे वेध देवून जाते. जे बबनराव पाचपुते राज्यातील सर्वात जास्त व्यायाम करणारे मंत्री, आमदार म्हणून ओळखले जात होते त्याच बबनदादांना आता तब्बेतीमुळे थांबण्याची वेळ येणार हे कुणालाही पटत नाही. पण मोठ्या संघर्षातून त्यांनी कमावलेले ‘राजकारणातील नाव’ आता त्यांचे दोन्ही पुत्र विक्रमसिंह व प्रतापसिंह (Vikramsingh Pachpute, Pratapsingh Pachpute) यांच्याकडे सुपर्द करावे लागणार असल्याचे दिसते.
मी अजून थकलेलो नाही, हा बबनराव पाचपुते यांचा आत्मविश्वास अजूनही ते लढण्याच्या तयारीत असल्याचा सांगतो. पण कुठेतरी थांबून वारसदरांना पुढे करावे लागणार आहे. तालुक्यातील वारसादर कधी बाहेर काढयाचा याचे उत्तम उदाहरण २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत जिल्ह्याने पाहिले आहे. कुकडी कारखान्याचे संस्थापक कुंडलिकराव जगताप यांनी त्यांना आमदार होण्याचे योग नाहीत हे लक्षात आल्यावर त्यांनी पुत्र राहूल याचे अस्त्र बाहेर काढले आणि त्यात ते यशस्वी झाले. त्याच पध्दतीने यंदाच्या विधानसभेसाठी विक्रमसिंह यांचे हक्काचे अस्त्र बाहेर काढून बबनदादा मार्गदर्शकाच्या भुमिकेत दिसतील ही शक्यता अधिक आहे.
विक्रमसिंह यांच्यासाठी भाजपाचे वरिष्ठ नेतेही सकारात्मक असल्याचे बोलले जाते. विक्रमसिंह यांचा राज्यातील व वरिष्ठ नेत्यांमधील वावर आता येथे फायद्याची ठरु शकतो. कारण मतदारसंघात जो काही निधी आला आहे तो बहुतेक निधी त्यांच्याच पाठपुराव्याने आल्याचे कार्यकर्ते बोलतात. भाजपच्या महत्वाच्या नेत्यांची मर्जी सांभाळण्यात विक्रमसिंह यशस्वी झाल्याने त्यांच्याकडे उमेदवारी चालून आल्याचे दिसते.
बबनराव पाचपुते यांचा मुलगा हे सर्वात मोठे आशास्थान असल्याने विक्रमसिंह काही महिन्यांपासून मतदारसंघात फिरत आहेत. त्यांची बोलण्याची पध्दत, लोकांशी चर्चा करताना दिसणारी आपुलकी, नव्या -जून्या लोकांशी वाढणारा त्यांचा संपर्क यावरुन त्यांनी तयारी सुरु केल्याचे स्पष्ट होते. ते जरी सांगत असले की, दादा हेच आमचे उमेदवार पण ती राजकीय भाषा ठिक असली तरी विक्रमसिंह हे श्रीगोंद्यात भाजपाची उमेदवारी मागणार हे निश्चित दिसते.
प्रतापसिंह पाचपुते यांच्यावर प्रचाराची धूरा…
बबनराव पाचपुते यांचे दुसरे पुत्र प्रतापसिंह यांच्यावर विधानसभा प्रचाराची व विरोधकांची कोंडी करण्याची जबाबदारी राहणार असल्याचे दिसते. कारण ते सध्या परिक्रमात बसून सगळ्यांचे नेटवर्किंग करीत आहेत. भविष्यात राजकीय डावपेच टाकण्यासाठी त्यांची तयारी दिसत आहे.