संजय आ. काटे
अखेर अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर लोणीव्यंकनाथ (ता. श्रीगोंदा) येथील २२० केव्हीए वीज केंद्रातून चिंभळे उपकेंद्राला वीज पुरवठा सुरू होणार आहे. त्यामुळे काष्टी-चिंभळे परिसरासह अनेक गावांना वीज कपातीच्या त्रासातून दिलासा मिळणार आहे.
काष्टी-चिंभळे परिसराचा वीज भार कमी होणार
श्रीगोंदा येथील ३३३ केव्हीए वीज केंद्रावर अनेक गावे व रोहित्रे असल्याने वीज भार जास्त होता. त्यामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. काष्टी आणि वांगदरी या राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वाच्या गावांना वीजपुरवठा सुधारण्यासाठी सतत प्रयत्न सुरू होते. शेतीसाठी आवश्यक वीज वेळेवर न मिळाल्याने शेतकरी वर्गही त्रस्त होता.
२७ वर्षांनंतर चिंभळे परिसराचा प्रश्न सुटणार
चिंभळे, बोरी, हंगेवाडी, येळपणे या गावांमध्ये वीजेचा तुटवडा वारंवार जाणवत होता. चिंभळे उपकेंद्र स्थापन होऊन जवळपास २७ वर्षे उलटली असली, तरी पुरेशा दाबाने वीज मिळत नव्हती. या भागात बागायती शेती मोठ्या प्रमाणावर असल्याने वीजेच्या कमी दाबाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत होता.
आता लोणीव्यंकनाथ २२० केव्हीए केंद्रातून थेट चिंभळे उपकेंद्राला वीज पुरवठा सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. महावितरणच्या मते, यामुळे काष्टी परिसराचा वीज भार कमी होईल, तर चिंभळे परिसराला नियमित व पुरेशा दाबाने वीज मिळेल.
मढेवडगावला अजून प्रतीक्षा करावी लागणार
मढेवडगाव उपकेंद्रासाठी लोणीव्यंकनाथ वीज केंद्रातून वीजपुरवठा तातडीने सुरू होणार नाही. सुमारे आठ दिवसांनी वीज पुरवठा सुरू होण्याची शक्यता महावितरणच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे मढेवडगावसह शिरसगावबोडखा, लोणीव्यंकनाथ, म्हातारपिंप्री, बाबुर्डी, पिंप्रीकोलंदर या गावांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
⏳ २ अथवा ३ मार्चपासून चिंभळे उपकेंद्राला नवा वीजपुरवठा सुरू होणार असल्याने परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.