संजय आ. काटे
श्रीगोदा, ता. २९ : राज्याच्या राजकारणात कायमच खास चर्चेत राहिलेल्या नगर जिल्ह्याचे राजकारण पुन्हा एकदा शरद पवार यांच्याच भोवती फिरु लागले आहे. मध्यंतरी राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार या जिल्ह्यात विशेष लक्ष देवून करामत करतील असे वाटत होते. तसे घडत नसून उलट आता शरद पवार यांचे वर्चस्व वाढतच असताना अजित दादांची राष्ट्रवादी बॅकफूटवर दिसतेय. विधानसभेसाठी साहेबांची जोरदार तयारी असतानाच अजितदादांची अडचण वाटते.
जिल्ह्यातील महत्वाच्या मतदारसंघावर शरद पवार यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. त्यांचे वजनदार नेते आता जिल्ह्यातील ठराविक मतदारसंघावर बारीक लक्ष ठेवून तेथील वास्तव चित्र साहेबांपर्यंत पोच करीत आहेत. त्यामुळे शरद पवार यांना जिल्ह्यातील खरी परिस्थिती लक्षात येत असावी. अर्थात पवार यांना जिल्हा पाठ असून काळानुरुप ते राजकीय व सामाजिकदृष्ट्या अपटेड झाल्याने सगळी माहिती त्यांच्यापर्यंत असते.
राष्ट्रवादीचे ( अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा यांनी पदाचा अचानक राजीनामा दिला. काही दिवसांपुर्वीच पक्षाचे पहिले जिल्हाध्यक्ष प्रशांत गायकवाड यांना हटवून नाहाटा यांनी नियुक्ती झाली होती. आता नाहाटा यांनी कामाचा अतिरिक्त ताणाचा विषय पुढे करुन हा राजीनामा दिल्याचे सांगितले. पण ते खरे नाही हे सगळ्यांनाच माहिती आहे. नाहाटा यांची ही स्ट्रॅटर्जी काय असते याचा मेळ लागत नाही. आजपर्यंत ती श्रीगोंद्यापुरती मर्यादीत होती, आता ती जिल्ह्याच्या राजकारणात आली. त्यांच्यावर कामाचा आहे हे पक्षाला का समजले नाही ? पक्षाने धुळ्याची जबाबदारी परत त्यांच्यावर का टाकली हे सगळेच न समजणारे आहे. विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर नाहाटा यांनी राजीनामा दिल्यावर पक्षापुढे नव्या अध्यक्षाच्या निवडीची जबाबदारी आहे.
जिल्ह्याच्या राजकारणात आता थोरल्या पवारांनी बारीक लक्ष घातले आहे. श्रीगोंद्यात काल प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील येवून गेले आणि आज खुद्द पवारच आले. कार्यक्रम शैक्षणिक असला तरी व्यावसपिठावर पवार असल्याने जवळपास सगळेच भावी आमदार हजर होते. त्यावरुन पवारांची पाॅवरही लक्षात येते. सगळ्यानाच पवारांचा आशीर्वाद हवा आहे. श्रीगोंद्यात पवार यांच्याकडे राहूल जगताप यांचा पत्ता आहे. तर आघाडीकडे अनेक पर्याय आहेत. त्याचवेळी अजित पवार यांच्याकडे अनुराधा नागवडे यांचे सध्या चर्चेत असणाऱ्या नेत्या आहेत. नागवडे कुटुंबाच्या संस्कारक्षम राजकारणाचा अजित दादांना उपयोग करुन घेता येईल असे वाटत नाही. कारण येथील जागा ही भाजपालाच जाणार हे फक्त जाहीर करण्याचे बाकी आहे. त्यामुळे नागवडे यांना अपक्ष लढावे लागेल. तसे झाल्यास श्रीगोंद्यातील अजित दादा यांचा गट मर्यादीत राहिल.
पारनेरमध्ये खासदार नीलेश लंके यांच्याविरोधात सगळ्याना एकत्र केले तरच उपयोग होणार आहे. अजित पवार ती मोहिम हाती घेणार नाहीत हेही सत्य आहे. नगर शहरात आमदार संग्राम जगताप घड्याळाचे चिन्ह घेणार असे आज तरी वाटत असले तरी थोड्या दिवसात तेथीलही स्थिती समजेल. शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात येथे चंद्रशेखर घुले स्वत:चे अस्तित्व ठेवून राजकारण करतात. आमदार शिवाजीराव गर्जे यांचा राजकीय वावर मर्यादीत दिसतोय. राहूरीत अजित कदम सोबत आहेत. कर्जत-जामखेड येथे भाजप व शरद पवार यांच्यातच खरी लढत आहे. तेथेही अजित पवार गट राजेंद्र गुंड यांच्यापुरताच मर्यादीत आहे.
जिल्ह्याच्या अनेक तालुक्यांमध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादी बॅकफूटवर आहे. त्याचवेळी शरद पवार यांनी जिल्ह्यातील राजकीय पकड अजून मजबूत करण्यासाठी अजून एक पाऊल पुढे टाकले आहे.
नगर जिल्ह्यात विखेही बॅकफूटवर….
नगर जिल्ह्यात विखे कुटुंबाचे अधिराज्य आहे. पण लोकसभा निवडणूकीनंतर या जिल्ह्यात आता विखे कुटुंबही मागे गेले आहे. नीलेश लंके या जायंट किलरने दिलेला जोरदार धक्का त्यांना अजूनही पचविता आलेला नाही. विखे यांच्यापेक्षाही शरद पवार यांचीच चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात आजही जास्त आहे. त्यामुळे विखे यांच्यासह अजित पवार यांना बॅकफूटवर ढकलत शरद पवार हे फ्रंटफूटवर गेले आहेत.