निष्ठावंत बनणार सांगकामे कार्यकर्ते
संजय आ. काटे
————
श्रीगोंदा, ता. १८ : श्रीगोंदा विधानसभा निवडणूक यावेळी रंगतदार होणार याबद्दल कोणाच्या मनात आता शंका नाही. अर्थात सध्या असणारे इच्छुकांपैकी प्रत्यक्षात निवडणुकीत किती राहतात हा कळीचा मुद्दा आहे. सध्याची परिस्थिती पाहता नेत्यांच्या वारसदारांनी प्रचाराची धुरा त्यांच्या हाती घेतल्याने, निष्ठावंत व प्रचार यंत्रणेत निपुण असणारी मंडळी अडगळी पडतात की काय अशी शंकाही येऊ लागली आहे.
श्रीगोंदा विधानसभा निवडणुकीसाठी विद्यमान आमदार व ज्येष्ठ नेते बबनराव पाचपुते, माजी आमदार राहुल जगताप, जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका अनुराधा नागवडे, काँग्रेस नेते घनश्याम शेलार, शिवसेनेचे उपनेते साजन पाचपुते यांच्यासोबतच जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, जिल्हा बँकेचे माजी संचालक दत्तात्रय पानसरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा, दीपक नागवडे, भारतीय जनता पक्षाच्या सुवर्णा पाचपुते, आम आदमी पार्टीचे राजेंद्र नागवडे, राष्ट्रवादीचे शरद नवले, निवास नाईक हे सध्या इच्छुकांच्या यादीत आहेत.
आमदार होण्याची घाई अनेकांना झाल्याने श्रीगोंद्यात डझनभर उमेदवार राहतील की काय अशी सद्यस्थिती असली तरी निवडणूक सुरू झाल्यानंतर काय होईल याबद्दलही वेगवेगळ्या चर्चा आहेत. भारतीय जनता पक्षाची उमेदवारी स्वतः बबनराव पाचपुते करणार की त्यांच्या पत्नी डॉ. प्रतिभा पाचपुते अथवा पुत्र विक्रमसिंह पाचपुते करणार याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यासोबतच महायुतीची उमेदवारी जर भाजपला मिळाली तर राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) अनुराधा नागवडे काय करणार याचीही उत्सुकता आहे. महायुतीची जागा भाजपाने न सोडल्यास नागवडे यांना अपक्ष उमेदवारी करावी लागेल.
दरम्यान महाविकास आघाडीतही उमेदवारीचा पेच आहे. राहुल जगताप, घनश्याम शेलार व साजन पाचपुते उमेदवारीवर हक्क सांगून आहेत. राहुल जगताप यांचे कार्यकर्ते त्यांना ‘साहेबां’नी शब्द दिला असल्याने ते कामाला लागले असल्याचे भासवित आहेत. मात्र राहुल जगताप हे कारखान्याच्या प्रश्नावर बॅकफूटवर असल्याने सध्या कार्यक्रमांना हजेरी लावत असले तरी निवडणूक प्रचार यंत्रणेतून अलिप्त वाटत आहेत.
त्याचवेळी काष्टी गावचे सरपंच असणारे शिवसेनेचे उपनेते साजन पाचपुते हे मात्र महाविकास आघाडीची उमेदवारी त्यांना जाहीर झाल्याचे भाषणातून सांगत आहेत त्यांनी तर निवडणूकीचा प्रचारच सुरु केल्याचे दिसते. काँग्रेसमध्ये गेलेले घनश्याम शेलार हे या दोघांची गंमत पाहत यावेळी महाविकास आघाडी पंजाच्या चिन्हावर निवडणूक लढवील अशी अपेक्षा बाळगून आहेत.
यातच सगळ्या पक्षात वावरणारे अण्णासाहेब शेलार निवडणूक लढणारच या मतावर ठाम आहेत. पानसरे व नाहाटा यांची आजपर्यंतची राजकीय स्ट्रॅटर्जी पाहता ते कधी काहीही करू शकतात याचा विश्वास मतदारांना व कार्यकर्त्यांना आहे. त्यामुळे त्यांची आजची भूमिका निवडणूकीत वेगळीही असू शकते.
एकीकडे निवडणुकीला उमेदवार कोण असणार याची चर्चा सुरू असतानाच, सध्याची निवडणूक यंत्रणा कोणाच्या हातात आहे हे थोडे दुर्लक्षित होत आहे. आमदार बबनराव पाचपुते यांची सगळी यंत्रणा विक्रमसिंह पाचपुते व प्रतापसिंह पाचपुते यांच्या ताब्यात आहे. त्याचवेळी अनुराधा नागवडे यांचीही यंत्रणा त्यांचे पुत्र पृथ्वीराज व दिग्विजय नागवडे यांच्या हाती दिसते. घनश्याम शेलार यांची यंत्रणात यांचे पुत्र प्रशांत शेलार यांच्या ताब्यात आहे. अण्णासाहेब शेलार हे लढतील की नाही हे नंतर ठरणार असले तरी सध्या त्यांचे सगळे नियोजन त्यांचे पुत्र बेलवडीचे सरपंच असणारे ऋषिकेश शेलार यांच्या हाती आहे. राहुल जगताप व साजन पाचपुते हे अजूनही त्यांच्या वडिलांच्या कर्तुत्वावर वावरताना दिसत असल्याने एका अर्थाने राजकीय दृष्ट्या दिवंगत नेते कुंडलिकराव जगताप व सदाशिवराव पाचपुते यांच्या पुत्रांच्या हाती त्यांच्या गटाच्या चाव्या आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या व्यतिरिक्त इच्छुक असणारे उमेदवार मात्र त्यांच्या कुवतीप्रमाणे स्वतः यंत्रणा हाताळीत आहेत. या सगळ्या राड्यात निष्ठावंत कार्यकर्ते, प्राचार हाताळणारे प्रमुख या निवडणुकीत बाजूला पडणार असल्याचे सध्या चित्र आहे.