ग्रामसेवक संघाच्या प्रयत्नांना दहा वर्षांनंतर अखेर यश
श्रीगोंदा, ता. २३ : राज्यातील ग्रामसेवकांच्या दहा वर्षाच्या लढ्याला आज यश आले. राज्य सरकारने ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदे बाजूला ठेवून आता ग्रामपंचायत अधिकारी या नव्या पदाला मान्यता दिल्याने मोठे यश मिळाले.
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघाच्या वतीने सन २०१४ मध्ये ग्रामसेवकांवरील व ग्रामविकास अधिकारी यांच्यामधील वेतनाची असलेली वेतनश्रेणीतली तूट भरून काढण्यासाठी ग्रामसेवक व ग्राम विकास अधिकारी या दोन पदांचे एकच पद करून ग्रामसेवकावरील अन्याय दूर करावा अशी भूमिका राज्य ग्रामसेवक संघाने मांडली होती.
तत्कालीन महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघाचे अध्यक्ष विजय म्हसकर,राज्य कार्याध्यक्ष विठ्ठलराव वाडगे व या सर्वांमध्ये मुख्य भूमिका घेणारे तरुण तडफदार राज्य सचिव अनिल जगताप यांनी अथक प्रयत्न केले होते. त्यानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष तात्यासाहेब पाटील, सरचिटणीस एस डी पाटील, राज्य सचिव अनिल जगताप, उपाध्यक्ष सागर सरावाने, सागर मोकाशी व प्रसिद्धी प्रमुख नवनाथ गोरे यांनी पाठपुरावा केला.
गेल्या दहा वर्षात लालफितीत अडकलेली फाईल आज पुर्णत्वाला आली. राज्याचे ग्रामविकास विभाग सचिव एकनाथ डवले यांचे सूचनेनुसार महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना डीएनए १३६ व महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ या पदाधिकाऱ्यांमध्ये एकत्रित बैठक होऊन हा एकच निर्णय पुढे नेण्याचे दोन्हीही संघटनांचे पदाधिकाऱ्यांनी मान्य केले. निर्णयासाठी आवश्यक ते संपूर्णपणे सहकार्य करण्याचे दोन्ही संघटनाने मान्य केले व एकत्रित केलेल्या प्रयत्नाला आज रोजी यश आले असून ग्रामसेवक व ग्राम विकास अधिकारी या दोन्ही पदांची एक पद करून ग्रामपंचायत अधिकारी हे पद निर्माण करण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला.
आज घेतलेल्या निर्णयाबाबत महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यासह यासाठी खास प्रयत्न करणारे ग्रामविकास विभागाचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास विभागाचे मुख्य सचिव एकनाथ डवले, तात्कालीन उपसचिव पोपटराव देशमुख
सर्व अधिकारी पदाधिकारी व या सर्वांसाठी प्रयत्न करणारे सर्व संघटनांचे पदाधिकारी सर्व ग्रामसेवक या सर्वांचे अभिनंदन केले आहे.
या निर्णयानंतर अनिल जगताप यांचे अहमदनगर जिल्ह्याचे कार्याध्यक्ष कैलास तरटे व राज्य प्रसिद्धी प्रमुख नवनाथ गोरे यांनी पेढा भरून अभिनंदन केले.