संजय आ. काटे
श्रीगोंदा, ता. २३ : उपजिल्हा रुग्णालयाला मंजूरी मिळून आता तब्बल अकरा वर्षे झाली. विशेष म्हणजे सरकार मेहरबान झाले आणि दोनदा मंजूरी दिली. महिन्यापुर्वी रुग्णालयासाठी जागा खरेदी झाली. पण महिन्यानंतरही सदर जागेची नोंद रुग्णालयाच्या नावाने लागलीच नाही.
सध्याच्या ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय, श्रीगोंद्याचे श्रेणीवर्धन करुन ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालयाची दोनदा प्रशासकीय मान्यता मिळाली. आजतागायत सदरील उपजिल्हा रुग्णालयाचे घोंगडे भिजत पडले आहे.
आमदार बबनराव पाचपुते व माजी आमदार राहुल जगताप यांनी प्रयत्न केले पण जागेअभावी बांधकामास प्रशासकीय मान्यता मिळूनही उपयोग होत नव्हता. आता गेल्या महिन्यात उपजिल्हा रुग्णालयासाठी जागा निश्चित होवून सदर जागेची खरेदी झाली. जागेचे खरेदीखत झाल्यावर २१ दिवसात ऑनलाईन नोंद लागते पण येथे सगळे सरकारी असतानाही महिना झाला तरी अशी नोंद लागलेली नाही. परिणामी जागेची नोंदच नसल्याने उपजिल्हा रुग्णालय इमारतीचे बांधकाम सुरु होत नाही हे वास्तव आहे.
श्रीगोंदा तालुक्यात एकूण ७ प्राथमिक आरोग्य केंद्र व ३९ उपकेंद्र आहेत. सध्या तालुक्यात एकमेव ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय आहे. तालुक्याचे क्षेत्रफळ, दोन राष्ट्रीय महामार्ग, ४ साखर कारखाने व लोकसंख्येचा विचार करता तालुक्यात अजून एक ग्रामीण रुग्णालय व १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय गरजेचे आहे. आजही अत्यवस्थ/गरोदर रुग्णाला संदर्भित करावयाचे असल्यास ६० किलोमीटर च्या आत एकही शासकीय संदर्भ रुग्णालय उपलब्ध नाही. शेजारील तालुके ( दौंड , कर्जत , जामखेड) , भौगोलिक व लोकसंख्येबाबत लहान असूनही, १०० बेडची उपजिल्हा रुग्णालये चालू आहेत.
श्रीगोंद्यात मृत्यू स्वस्त, उपचार महाग….
श्रीगोंदा पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या वर्षभरात अपघातात ३५ जण मयत झाले तर ३२ जण गंभीर जखमी झाले. चालू वर्षात आजपर्यंत ३९ जणांना जीव गमवावा लागला तर ३५ जणांना गंभीर दुखापत झाली. श्रीगोंद्यासह आसपासच्या तालुक्यात अपघातग्रस्त रुग्णाला उपचार घेणे आर्थिक अडचणीचे झाले आहे. जर उपजिल्हा रुग्णालय असते तर नक्कीच काही लोक वाचले असते. त्यामुळे मरण स्वस्त आणि उपचार महाग अशी अवस्था दुर्देवाने झाली आहे.
उपजिल्हा रुग्णालय असल्याचे फायदे…..
- सर्व तज्ञ डॉक्टर उपलब्ध
- भूलतज्ज्ञ व स्रीरोगतज्ञ पूर्णवेळ उपलब्ध असल्याने प्रसूती च्या रुग्णाची हेळसांड थांबेल
- अपघात , विषबाधा, सर्पदंश व अत्यवस्थ रुग्णांचे जीव वाचतील
- अनेक गरीब व सर्वसामान्य रुग्णाला मोफत उपचार मिळतील
- सोनोग्राफी सुविधा उपलब्ध होईल
- रक्तपेढी मुळे अनेकांचे प्राण वाचतील
- एकंदरीत सर्वांचे मिळून खासगी दवाखान्यात खर्च होणारे लाखो रुपये वाचतील