शिक्षक आदर्शच आहे मग त्यासाठी पैशाची गरज का ?
अहमदनगर, ता. २४ : ‘पैसे द्या अन् काम करून घ्या’, असा मंत्र काही शासकीय कार्यालयात राबविला जातो, या मंत्राची अंमलबजावणी सर्वच ठिकाणी केली जाते. पण आता असाच काहीचा मंत्र शिक्षण क्षेत्रात राबवला जात असल्याची पक्की खबर आहे. आदर्श व्हायचे का ? असे विचारत रक्कम ठेवा आणि पुरस्कार घ्या, अशी थेट ऑफर शिक्षकांना दिली जात असल्याने जोरदार चर्चा जिल्ह्यात आहे.
शिक्षण क्षेत्र पवित्र समजले जाते. भावी पिढी घडविण्यासाठी शिक्षक जीवाचे रान करतात. प्रामाणिकपणा ठेवून ज्ञानदानासोबतच सरकारच्या विविध उपक्रमात राबत असतात. पण आता त्यांना एका ठिकाणाहून आपणाला आदर्श असल्याचा पुरस्कार देवून आम्ही सन्मान करणार आहोत. आपल्या कार्याची महती लोकांपर्यंत पोच करुन पुरस्कारही देवू पण त्यासाठी ठराविक रक्कम द्या असे आवाहन करण्यात येत असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
पैसे द्या आणि पुरस्कार घ्या, हा मंत्र राबविताना पैसे देऊन सन्मान करून घेतले जाणार आहेत. या पैसे देऊन पुरस्कार स्वीकारण्याच्या प्रकाराने शिक्षण क्षेत्र आता बदनाम होणार नाही का ? असे प्रश्न समोर येत आहेत. पवित्र असणाऱ्या क्षेत्राला बदनाम करण्याचा घाट कोण घालतेय याची चर्चा सुरु आहे.
उत्कृष्ट काम असेल तर एखाद्याचा सन्मान होणे गरजेचे आहे. या सन्मानामुळे नेहमीच अनेकांना काम करण्याची प्रेरणा मिळत असते. ही प्रेरणा घेऊन इतरही कामकाज करतात. त्यामुळे एक चांगली फळी तयार होते. म्हणून शासकीय कार्यालयांमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्याचा सन्मान त्या कार्यालयासह इतर सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्था करीत आहेत. या संस्था सन्मान करताना कर्मचाऱ्यांना पुरस्कार देतात. यामुळे संबंधिताला काम करण्याची प्रेरणा मिळत राहते. त्या व्यक्तीचे काम व त्याचा सन्मान पाहून इतरांच्या मनातही आपला सन्मान व्हावा, असा निश्चय करून कामकाज करीत असतात. त्यामुळे अनेक कार्यालयातील कामकाज सुरळीत सुरु झालेले आहे.
परंतु आता कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे पुरस्कार बदनाम झालेले आहे. कारण काही संस्थांनी थोडे पैसे घेऊन पुरस्काराचे खिरापतीसारखे वाटप सुरु केलेले आहे. या पुरस्कारांचे व सन्मान मिळविण्याचे लोण आता शिक्षकांपर्यंत पोहचलेले आहे. जिल्हा परिषदेचे पुरस्कार जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसाठी आहेत. परंतु या पुरस्कार मिळविण्यासाठी अनेक निकष आहेत. त्यामुळे इच्छा असूनही तसेच निकषासह परीक्षेत उत्तीर्ण न झाल्याने अनेकजण वंचित राहिलेले आहे. याच संधीचा काहींनी लाभ उठविण्यास सुरवात केलेली आहे. थोडेफार पैसे घेऊन पुरस्कार देण्यास सुरवात केलेली आहे. या विकतच्या पुरस्कारांची क्रेज शिक्षकांमध्ये वाढत गेलेली आहे. पैसे जाऊ द्या, पण पुरस्कार मिळू द्या, असा निर्धारच काहीजण करीत आहेत. (अर्थात याला अनेकजण अपवाद असून पुरस्कारासाठी पैसे देणार नाही असा मतप्रवाह पुढे आला आहे).
काहीजण सावज शोधून संबंधितांना देत आहेत. त्यातून ते आपले पंधरा टक्के कमीशन घेत आहे. स्वस्तातील पुरस्कार कमिशनमुळे महाग झालेले आहेत. पुरस्कार मिळाल्यानंतर शिक्षकांचे मोठे सत्कार सोहळे केले जाणार आहेत. परंतु दरवर्षीच मोठ्या प्रमाणात शिक्षकांना सप्टेंबर व आॅक्टोबरमध्ये पुरस्कार कसे मिळतात, याची चर्चा सर्वसामान्यात सुरु झालेली आहे. एकाच्या तोंडून ही चर्चा दहाच्या तोंडी होऊन पुरस्कार मिळण्यामागचे रहस्य उघडे झाल्यानंतर अनेकजण शिक्षकांची खिल्ली उडवू लागले आहे. किती पैसे देऊन पुरस्कार विकत घेतला असा प्रश्न शिक्षकांना अनेकजण करू लागलेले आहे. यामुळे शिक्षकांची प्रतिमा आता धुळीस मिळत चालली आहे. त्यामुळे किमान शिक्षकांनी तरी विकत पुरस्कार घेणे टाळावे अशी सामान्यांची अपेक्षा आहे.