सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटकेत असणारा वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तिय कार्यकर्ता आहे. त्यामुळे मुंडे अडचणीत आले होते व त्यांच्यावर टोकाचे आरोप होत आले आहेत. त्यासोबतच पीकविमा घोटाळ्यासह इतर प्रकरणामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पाठिशी राहण्याचा निर्णय घेतला.
देवगिरीवर झालेल्या महत्वाच्या पक्ष बैठकीत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत राजीनामा नाही अशी भूमिका पुन्हा एकदा घेण्यात आली आहे.त्याचवेळी आगामी महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सात जणांची कोर कमिटी स्थापन करण्यात आली. त्यातही धनंजय मुंडे यांना स्थान देवून पवार यांनी मुंडे यांना पक्षाच्या वतीने क्लिनचिट दिल्याचे स्पष्ट होते.
दोन दिवसांपुर्वी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी अजित पवारांची भेट घेण्यासाठी वेळ मागितली होती.परंतू अजितदादांनी ही भेट नाकारल्याचे समोर आले होते. पालकमंत्री असताना धनंजय मुंडे यांनी जिल्हा नियोजनाच्या ८७७ कोटींच्या निधी वाटपात दुजाभाव केल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांचा आहे. नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत बैठक झाली.जवळजवळ दोन तास यामध्ये खलबते झाली. तीत पुराव्याच नाहीत त्यामुळे कारवाईचा प्रश्नच नाही हा आधारावर बोट ठेवत अजित पवारांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली. धनंजय मुंडे दोषी ठरत नाही तोपर्यंत कारवाई नाही असेही अजित पवार यांनी स्पष्ट करीत,मुंडेवरील आरोप पुरावे देऊन जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत कारवाई नाही. बीड प्रकरणात तिहेरी चौकशी सुरू असून अहवाल आल्यावर पुढचा निर्णय घेऊ असे अजित पवार यांनी सांगत सध्या ते मुंडे यांच्याच सोबत असल्याचे दाखविले.
