शालेय क्रिकेट स्पर्धेत दुहेरी यश
श्रीगोंदा,ता. ३० : तालुक्यातील देवदैठण येथील श्री संतश्रेष्ठ निंबराज महाराज विद्याधाम प्रशालेच्या क्रिकेट संघांनी दोन गटात विजेतेपद मिळवत दुहेरी यश संपादन केले .
काष्टी येथील परिक्रमा संकुल येथे नुकत्याच तालुकास्तरीय शालेय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा संपन्न झाल्या. यात विद्याधाम प्रशालेच्या १४ वर्ष मुलांच्या संघाने तर १७ वर्ष मुलींच्या संघाने विजेतेपद पटकावले .
मुलांच्या संघाने लोणी व्यंकनाथ संघाचा ८ गडी राखून पराभव करीत एकतर्फी विजय मिळवित अजिंक्यपद खिशात घातले. यात जुनैद पठाण ,करण ठाणगे, सार्थक भोस , समर्थ मखरे ,धीरज हानवते या खेळाडूंनी फलंदाजी व गोलंदाजीत चमक दाखवत संघाच्या विजयात मोठा वाटा उचलला.
१७ वर्षे वयोगटात साक्षी बनकर,समीक्षा वाळुंज,ज्योती गव्हाणे,नागेश्वरी वाघमारे,श्रावणी कांडेकर यांनी उत्कृष्ट खेळ करत उक्कडगाव व लोणी व्यंकनाथ संघाचा पराभव करत विजेतेपद मिळवले .
दोन्ही संघांची कोकमठाण येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय शालेय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ते या स्पर्धेत श्रीगोंदा तालुक्याचे नेतृत्व करणार आहेत .
या खेळाडूंना क्रीडाशिक्षक संदीप घावटे , सतीश झांबरे , अमोल कातोरे , सतीश कौठाळे , कांता मांडगे , सोनाली वाघमारे यांचे मार्गदर्शन लाभले .
या सर्वांचे शिरुर शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष अनिल बोरा,सचिव नंदकुमार निकम,शाळा समितीचे अध्यक्ष चंदुलाल चोरडिया, क्रीडा समितीचे अध्यक्ष सचिन जामदार, मुख्याध्यापक विशाल डोके, पर्यवेक्षक नामदेव डुंबरे यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या .