नेत्यांसोबत आता कार्यकर्त्यांचेही खिसे गरम…..
संजय आ. काटे
विकास, आश्वासने, प्रलंबित कामे हे सगळे विषय बासनात गुंडाळले गेले असून श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात सध्या फक्त आणि फक्त तडजोडी सुरु आहेत. नेते, प्रमुख कार्यकर्त्यांना फोडण्यासाठी बॅगा भरुन रकमा पोच केल्या जात असून हे कुणा एकाचे सुरु नसून लढाईत उतरलेल्या बहुतेकांचे हेच ध्येय दिसत आहे.
श्रीगोंदा विधानसभा निवडणूक आता वेगळ्याच ट्रेंडमध्ये आली आहे. निवडणूकीला आठ दिवस असतानाच पैशाचा चुराडा सुरु झाला आहे. चर्चेत असणारे आकडे ऐकुण अनेकांना भोवळ येत आहे. फुटलेले आणि रुसलेला कार्यकर्ता शोधून त्याच्या घरी जावून त्याला समजविण्याचे दिवस आता जूने झाले आहेत. जो कार्यकर्ता रुसला आहे त्याच्या घरी थेट बक्षिस पोच केले जाते. नव्याने कार्यकर्ता फोडण्यासाठी नवीन स्किम आणली जाते आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे या सगळ्या चर्चा जामीवपुर्वक घडवून आणणारी नेत्यांची टिमही तयारच असते.
महाविकास आघाडीची उमेदवारी अनुराधा नागवडे यांना मिळाल्यानंतर थेट नेत्यांवरच खोके घेतल्याचा आरोप माजी आमदार राहूल जगताप यांनी केला. त्यानंतर जगताप यांच्या गळ्याला काही लोक लागले त्यात किती व्यवहार झाला याचा हिशोब त्यांचे विरोधक मांडत आहेत. आमदार बबनराव पाचपुते यांनी निधी आणल्यानंतर त्यातील विकास कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी घेतल्याचा आरोप केला जातोय.
हे सगळे होत असताना अण्णासाहेब शेलार यांची उमेदवारी कशी झाली याचीही वेगळी चर्चा रंगत आहे. त्यामुळे कार्यकर्ता व मतदाराला एक समजले आहे की, उमेदवारांकडे भक्कळ पैसा असून तो खर्च होणार आहे. त्यामुळे आता कार्यकर्ते कामाला लागण्यापुर्वीच आमचे बोला असे थेट प्रश्न करीत आहेत. नेत्यांनीच पैशाचे राजकारणात सुरु केल्याने गावातील प्रमुख सगळीकडूनच पैसे घेण्यासाठी तयार आहेत नव्हे घेत आहेत.
या सगळ्यात आता मतदारानेच काय गुन्हा केला की काय असे वाटत असतानाच, एका मताला पाच हजार असा भावही एका उमेदवाराच्या कार्यकर्त्याने फोडल्याने या निवडणूकीचा खर्च कुठपर्यंत जाणार याचे गणिते जूळणार नाहीत. जिंकणारा उमेदवार अशा परिस्थितीत कुणाचेच काम करु शकणार नाही हे खरे असले तरी आत्ताचे पाहू उद्याचे उद्या पाहू असे सुरु झाल्याने विकास कामात टक्केवारी गोळा करण्याशिवाय नेत्यांनाही पर्याय नाही हेच उत्तर पुढे येते.