जगताप समर्थक कार्यकर्ते म्हणतात अपक्ष लढा आणि गुलाल घ्या…
संजय आ. काटे
राष्ट्रवादी (शरद पवार गट) उमेदवारी देईन या आशेवर बसलेल्या माजी आमदार राहूल जगताप यांच्या हाती निराशा आली. अनुराधा नागवडे यांना पक्षात घेत शिवसेनेने उमेदवारी दिल्याने जगताप यांच्या सोबत गोलीगत धोका झाला आहे. पण आता राजकारणाच्या या लढाईत कुंडलिकराव तात्या यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विरोधकांना बुक्कीत टेंगुळ आणण्याची तयारी साठी राहूल जगताप तयारीत आहेत.
लोकसभा निवडणूकीत निष्ठावान राहिलेल्या जगताप यांना आज महाविकास आघाडीने डावलले. अनुराधा नागवडे यांच्यावर विश्वास टाकत महाविकास आघाडीने त्यांच्या हाती मशाल देत ठाकरे गटाने जल्लोष केला. आपल्या पक्षाच्या नेत्यांवर विश्वास टाकणाऱ्या जगताप यांना शरद पवार यांनी का डावलले याचे उत्तर त्यांच्या कार्यकर्त्यांना सापडत नाही. त्यामुळे उद्या गुरुवारी सकाळी जगताप यांनी त्यांच्या घरी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. त्यात विचारविनिमय करुन पुढचा निर्णय होईल.
दरम्यान जगताप अपक्ष लढण्याच्या मनस्थितीत आहेत. त्यासाठी त्यांनी सेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप करुन आक्रमणाची सुरुवातही केली.
राहूल जगताप यांचे वडील कुंडलिकराव जगताप यांची आज सगळ्यांनाच आठवण झाली. तात्यांनी कुठलीही गोष्ट करताना आक्रमक धोरण घेतानाच, कायम सडेतोड राजकारण केले. राहूल जगताप हे त्या तुलनेत मवाळ आहेत. त्यामुळेच आज त्यांना पक्षासह सहकारी पक्षांनी फसविले की काय अशी शंका घेतली जात आहे. आजच प्रवेश आणि लगेच उमेदवारी हे सुत्र जुळत नसल्याचे सांगत जगताप यांनी संजय राऊत यांच्यावर थेट आरोप केले. त्यामुळे या गोलीगत धोक्याला आता बुक्कीत टेंगुळ असे उत्तर देण्यासाठी जगताप यांची यंत्रणा राबत आहे….