निधीची कमी आणि टक्केवारीची चर्चा जास्त
संजय आ. काटे
श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ बहुतेक वेळा आमदार बबनराव पाचपुते यांच्याच पाठीशी आहे. मतदारसंघाचा विकास झाला नाही असेही नाही, पण मुलभुत प्रश्न सुटलेले नाहीत हेही वास्तव नाकारता येत नाही. गेल्या पाच वर्षात पाचपुते यांनी कोट्यावधींचा निधी आणल्याचा दावा भाजपाचे उमेदवार विक्रम पाचपुते करतात. पण त्याचवेळी त्यांच्यावर याच निधीतून टक्केवारी कमावल्याचा गंभीर आरोप होतोय. त्यातच तालुक्यात निधी आला पण दर्जेदार कामे झाली का ? या प्रश्नांचे उत्तरेही पाचपुते यांना द्यावी लागणार आहेत. केवळ विरोधकांच्या मतांच्या विभागणीवर विजयाचे गणित आखणाऱ्या पाचपुते यांना गाफिल राहूल चालणार नाही.
यंदाच्या निवडणूकीत पाचपुते-नागवडे- जगताप या तीन प्रस्थापित घराण्यांसह अण्णासाहेब शेलार, सुवर्णा पाचपुते या नेत्यांनीही नशिब अजमिण्यासाठी विधानसभेच्या मैदानात उडी घेतली आहे. ज्यावेळी एकापेक्षा जास्त ताकतवान उमेदवार समोर आले त्यावेळी, पाचपुते सहीसलामत सुटले हा राजकीय इतिहास आहे. यंदाही पाचपुते गट हीच आस लावून प्रचारात आहे. पण यंदा खु्द्द बबनराव पाचपुते हे उमेदवार नाहीत हेही लक्षात घ्यावे लागणार आहे. बबनराव पाचपुते यांनी शुन्यातून विश्व निर्माण केले, आता त्याच विश्वावर त्यांचे पुत्र विक्रम हे रंणागणात उतरले आहेत.
प्रतिभा पाचपुते यांना भाजपाने पहिल्याच यादीत उमेदवारी जाहीर केली. त्यावेळी विक्रम यांना उमेदवारी द्या, असे सांगण्यासाठी त्यांनी मुंबईही गाठली होती. पण विक्रम हे सर्व्हेत मागे असल्याने त्यांना पक्षाने उमेदवारी नाकारल्याचे वास्तव बबनराव पाचपुते बोलून गेले. तरीही नंतर उमेदवारीच माघारी घेत विक्रम यांना पुढची चाल दिली. पाचपुते कुटुंबाने उमेदवारी बदलल्याने काही प्रमाणात समिकरणे बदलली आहेत. पण त्याचा किती परिणाम होतोय हे निकालात स्पष्ट होईल.
आता विक्रम पाचपुते यांच्याविरुध्द राहूल जगताप, अनुराधा नागवडे, अण्णासाहेब शेलार अशी प्रमुख लढत आहे. विरोधकांच्या मतांच्या विभागणीमुळे आपला विजय निश्चित असल्याचे पाचपुते गट बोलत आहे. इतिहास पाहता हे खरेही आहे. पण राहूल जगताप यांना मिळणारी सहानुभूती आणि अनुराधा नागवडे यांचे प्रचारातील संभाव्य नियोजन पाहता पाचपुते गाफिल राहिले तर त्यांचा राजकीय घात होवू शकतो हा धोकाही लक्षात घ्यावा.
मतदार संघात कोट्यावधी रुपये आणल्याचा दावा पाचपुते करतात. पण त्याचा थेट परिणाम विकासात दिसत नाही. निधी किती आणला हे सांगतात दर्जेदार कामे किती आहेत याचे उत्तर पाचपुते यांना द्यावे लागणार आहे. त्यातच निधीपेक्षा टक्केवारीची होणारी चर्चा पाचपुते यांच्या राजकारणावर वेगळा परिणाम करत असल्याचेही लक्षात घ्यावे लागेल. केवळ विरोधकांच्या मतांच्या विभागणीवर जिंकू हे गणित यंदा त्यांच्यासाठी घातक आहे. तालुक्यातील रस्त्यांवर किती खर्च केला व त्यात किती रस्ते दर्जेदार आहेत हे त्यांना सांगावेच लागेल.त्यातच विक्रम पाचपुते मध्यंतरी अनेक वर्षे अज्ञातवासात होते. गेल्या काही वर्षात पुन्हा ते यंत्रणेत आले आहेत. त्यातच त्यांचे दिवंगत चुलते सदाशिव पाचपुते यांचे कुटुंब त्यांच्यापासून दुरावले आहे. काष्टी गावावर भरोसा ठेवून ते असले तरी तेथे साजन पाचपुते शेवटच्या टप्यात गोंधळ घालू शकतात. विक्रम पाचपुते नको, असे म्हणणारेही काही पाचपुते समर्थक आहेत. त्यांचा मतात जर परिणाम दिसला तर अडचणीत भर पडेल हेही पाचपुते यांना जमेला ठेवावे लागेल.
अण्णासाहेब शेलार यांचा प्रभाव असणाऱ्या मतांवर पाचपुते यांचे आजवरचे राजकारण रंगले आहे. कुणीही काहीही म्हणाले तरी, पाचपुते यांच्यासोबत असणारा ओबीसी मतांचा टक्का त्यांच्यासाठी निर्णायक ठरला आहे. त्यामुळे शेलार यांच्या मतांकडे लक्ष ठेवावे लागेल. एकुणच वरकरणी मतांच्या विभागणीत निकाल विक्रम पाचपुते यांच्या बाजूने झुकल्याचे आज चित्र असले तरी ते गाफील राहिले तर उलटफेर होण्यास वेळ लागणार नाही हे लक्षात घ्यावे लागेल.