संजय आ. काटे
महाविकास आघाडीचे उमेदवारीवरुन तळ्यात मळ्यात सुरु असतानाच, भारतीय जनता पक्षाने आज श्रीगोंद्यात मास्टरस्ट्रोक मारला. विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्या पत्नी डाॅ. प्रतिभा पाचपुते यांची उमेदवारी पहिल्याच यादीत जाहीर करुन लाडकी बहिण योजनेचा फायदा उचलण्यासाठी पहिले पाऊल उचलले.
आमदार बबनराव पाचपुते आजारी असल्याने त्यांच्या घरात उमेदवारी दिली जाणार हे निश्चित होते. त्यासाठी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रमसिंह पाचपुते यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. त्यातच त्यांचे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी असणारी जवळकी, तरुण चेहरा यामुळे महायुतीची उमेदवारी त्यांना मिळू शकते असा कयास बांधला जात होता. पण भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठांनी आज पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आणि तीत प्रतिभा पाचपुते यांचे नाव आले. त्यामुळे काहींसाठी अनपेक्षीत असले तरी पक्षाच्या नेत्यांनी ही उमेदवारी जाहीर करुन मास्टरस्ट्रोक खेळल्याचे दिसते.
राज्यभर गाजत असणारी लाडकी बहिण योजना श्रीगोंद्यात चांगलीच चर्चेत आहे. त्याचा फायदा घेण्यासाठी ही उमेदवारी उपयोगी ठरणार आहे. डाॅ. प्रतिभा पाचपुते यांची महिला वर्गात विशेष लोकप्रियता आहे. त्यांनी बचतगटाच्या माध्यमातून महिलांचे मजबूत केलेले संघटन मोठे आहे. १९८४ पासून त्या आमदार पाचपुते यांचे राजकारण जवळून पाहत आहेत. त्यांनी काष्टी जिल्हा परिषद गटातून निवडणूकही जिंकली आहे. पाचपुते कुटुंबाचा कणा म्हणून त्या त्यांच्या नातेवाईक व कार्यकर्त्यांमध्ये ओळखल्या जातात. शिवाय तालुक्यातील जाहीर होणाऱ्या पहिल्या महिला उमेदवार म्हणूनही त्यांची वेगळी ओळख होणार आहे. हे सगळे जमेला धरुन भाजपाने त्यांच्या उमेदवारीची चाल खेळली असावी.
पाचपुते यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह..
डाॅ. प्रतिभा पाचपुते यांची उमेदवारी जाहीर झाल्यावर सगळीकडे जल्लोष करण्यात आला. पाचपुते कुटुंबाचे नातेगोते मोठे आहे. बबनराव पाचपुते यांच्यसोबत हे नातेगोते घट्ट करण्यात प्रतिभा पाचपुते यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या उमेदवारीने आता कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असतानाच, विरोधकांमध्ये काहीशी अस्वस्थता पसरली आहे. विक्रमसिंह पाचपुते यांची उमेदवारी असती तर जोरदार राजकीय हल्ला करता आला असता पण आता ते करताना अडचणी येणार आहेत.