प्रमुखांवर होतेय मोठी उधळण….
संजय आ. काटे
श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात अनेक कार्यकर्त्यांना आमिषे दाखवून त्यांना फोडले जात आहे. हे एकाच पक्षात अथवा उमेदवाराकडे होत नसून बहुतेक प्रमुख उमेदवारांची यंत्रणा त्यासाठी कार्यरत आहे. त्यासाठी नेत्यांचे खास पॅर्टन राबत असून शहर व गावातील कार्यकर्त्यांचे वेगळे रेटकार्ड असून काही नेत्यांचे खिसे भरण्यासाठी मोठी बोली लागल्याची चर्चा आहे.
श्रीगोंद्यात महायुतीकडून विक्रम पाचपुते, महाविकास आघाडीकडून अनुराधा नागवडे, ‘वंचित’चे अण्णासाहेब शेलार यांच्यासह राहूल जगताप हे अपक्ष रिंगणात आहेत. यांच्यासोबत इतरही महत्वाचे उमेदवार असले तरी सध्या या चौघांचीच चर्चा रंगली आहे ती फोडाफोडीच्या राजकारणाने. मोठ्या नेत्यांचे पक्षबदल, उमेदवार बदल झाले. आता गेल्या काही दिवसांपासून प्रमुख कार्यकर्त्यांची लिलाव पध्दतच सुरु आहे. त्यासाठी सगळ्याच उमेदवारांची विशिष्ट यंत्रणा राबत आहे. त्यात कुणी शेठ, कुणी दादा, कुणी भैय्या, साहेब तर कुणी अण्णा, तात्या आहे. सुरुवातीला एका एक्षाच्या काही प्रमुख कार्यकर्त्यांनी प्रचात सक्रिय होण्याबाबत नाराजी दाखवली होती. पण त्यातील काहींना वेगळ्या प्रकारे मॅनेज करण्यात आल्याची चर्चा आहे. एका उमेदवाराच्या यंत्रणेने तर ‘हात’ खुलेच सोडल्याची चर्चा आहे. फक्त बोला असा ‘आदेश’च त्यांना आल्याची खुलेआम चर्चा आहे.
सध्या गठ्ठा मते असणाऱ्यांना थेट लालूच दाखवून जवळ ओढण्याचे धोरण उमेदवारांनी घेतले आहे. त्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजण्याची त्यांची तयारी आहे. आपल्या व्यासपीठावर व प्रचारयंत्रणेत ‘तो’ आला पाहिजे असा आदेश नेत्यांनी दिला की कार्यकर्ते कामाला लागतात.
त्यातच आता अनेक प्रमुखांची भूमिका अजूनही गुलदस्त्यात आहे. त्यातील काही जण कुणाची ऑफर जास्त आहे याचा अंदाज घेत आहेत. गावातील काही कार्यकर्त्यांना पाकीटे आल्याची चर्चा असून, त्यांना कामाला लागण्याचे फर्मान आले आहे. काही ठिकाणी कार्यकर्ते दुसऱ्या उमेदवाराच्या यंत्रणेत पेरण्यासाठीही मोठ्या उलाढाली झाल्याची चर्चा आहे. हे सगळे बंद खोलीतील व्यवहार असल्याने कुणाकडेही पुरावा नाही, पण मतदार जागा राहिला तर ते मतदानात दिसणार आहे याची जाणीव या यंत्रणेला सध्या तरी नाही.