बबनदादा आणि राहूलदादा उपकाराची परतफेड करा- राजेंद्रदादा नागवडे यांचे आवाहन

आमच्यामुळेच तुम्ही दोघे आमदार -राजेंद्र दादांचा पाचपुते-जगताप यांच्यासमोरच दावा

संजय आ. काटे
श्रीगोंदा, ता. ३ : राहूलदादा तुम्हाला आम्ही आमदार केले आणि बबनरावदादा तुम्हाला गेल्यावेळी मदत केली त्यामुळे तुम्ही आमदार झालात, पण आता या उपकाराची परतफेड करण्याची तुमची वेळ असून यावेळी मला मदत करा असे थेट आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र नागवडे यांनी केले.
म्हातारपिंप्री ता. श्रीगोंदा येथील एका धार्मिक कार्यक्रमात हे तिन्ही नेते एकत्र आले होते. कार्यक्रम जरी धार्मिक असला तरी श्रीगोंद्यातील नेते हातात माईक आल्यावर संधी सोडत नाहीत. तेथील एका मंदीरात सभामंडप देण्याची मागणी स्थानिक कार्यकर्त्यांनी केली. त्यावर उत्तर देताना अगोदर राहूल जगताप म्हणाले, माझ्या हातात कोणतीच सत्ता नाही. पण खासदार नीलेश लंके यांच्या वतीने मी शब्द देतो की, सभामंडपासाठी दहा लाखाचा निधी मिळवून देईन. त्यानंतर राजेंद्र नागवडे बोलायला उठले. ते म्हणाले, या दोघांनाही आम्हीच आमदार केले आहे. २०१४ मध्ये राहूलदादा आमदार झाले त्यात आमचा वाटा मोठा होता. गेल्यावेळी बबनरावदादा आमदार झाले त्यावेळी त्यांचे काम आम्ही केले व त्यांना आमदार केले. उपकाराची परतफेड करावी लागते नाही तर देव माफ करीत नाही हे जमेला धरुन यावेळच्या विधानसभेला या दोघांनी मला मदत करुन आमदार करावे ते तुमचे कर्तव्य आहे. अशी मदत केल्यास आपल्या सभा मंडपासाठी दहा लाख काय पन्नास लाखांचा निधी देतो असे म्हणताच उपस्थितांनी टाळ्या वाजवित दाद दिली.

त्यांच्यानंतर आमदार बबनराव पाचपुते भाषणात म्हणाले, या गावासाठी आपण कायमच मदत केली आहे. काही वर्षात नव्याने ३५ लाखांचा निधी दिला आहे. यापुढेही अशीच मदत सुरु ठेवू.

दरम्यान राजेंद्र दादांच्या वक्तव्यावर नगर टुडेशी बोलताना माजी आमदार राहूल जगताप म्हणाले, राजेंद्रदादा यांच्यावर आमचे अगोदरच उपकार आहेत. २००९ मध्ये ते भाजपाच्या उमेदवारीवर विधानसभा लढले. त्याजागेवर त्यावेळी माझे वडील तात्यांचा हक्का होता पण नागवडे यांनी उमेदवारी मिळवली. त्यावेळी बापु भाजपाच्या व्यासपिठावर नव्हते पण आम्ही होतो. त्यावेळी आम्ही नागवडे यांना मते दिली त्यामुळे २०१४ मध्ये त्यांना आमचे काम करावे लागले. त्यामुळे उपकार फिटले आहेत.