अनुराधा नागवडे यांच्याकडे सर्व पर्याय खुले
संजय आ. काटे
Shrigonda Political News : श्रीगोंदा,ता. २२ : दिवंगत नेते शिवाजीराव नागवडे ( Shivajirao Nagwade) यांनी आयुष्यभर संस्काराचे आणि संघर्षाचे राजकारण केले. राजकारणात सगळे माफ असतानाही त्यांनी संस्काराची चौकट कधी सोडली नाही. आता त्यांच्या सुष्ना अनुराधा राजेंद्र नागवडे ( Anuradha Rajendra Nagwade) विधानसभेच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. महायुतीची उमेदवारी त्यांना मिळावी यासाठी प्रयत्न करीत असतानाच, वेळप्रसंगी सगळी तयारी ठेवा, आता माघार नाही असा संदेश कार्यकर्त्यांना मिळाल्याचे समजते.
साठ वर्षांपेक्षा जास्त काळ नागवडे कुटुंबीय राजकारण व सहकारात आहे. जेष्ठ दिवंगत नेते शिवाजीराव बापु नागवडे यांनी त्यांचा काळ कसा गाजविला याची उदाहरणे आजही तरुणांपुढे आहेत. त्यांचे पुत्र राजेंद्र नागवडे हे कारखान्याचे अध्यक्ष आहेत. तर बापुंच्या सुष्ना अनुराधा यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे महिलाचे जिल्हाध्यक्षपद आहे. जिल्हा सहकारी बँकेच्या त्या संचालिकाही आहेत.
गेल्यावेळी नागवडे यांच्या घरात राष्ट्रवादीची आयती उमेदवारी चालून आली होती. पण त्यावेळी ती नाकारत राजेंद्र नागवडे यांनी भाजपात प्रवेश केला होता. निवडणूका झाल्यावर पुन्हा ते काँग्रेसमध्ये स्थिर झाले. मध्यंतरी राष्ट्रवादीत फूट पडली आणि त्यांनी काँग्रेसनेते बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat) यांचा हात सोडत उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar) यांचे घड्याळ हाती बांधले. आता अनुराधा नागवडे या विधानसभेची तयारीत आहेत. महायुतीचे आमदार बबनराव पाचपुते ( Babanrao Pacchpute) स्वत: अथवा त्यांचे पुत्र विक्रमसिंह उमेदवारी करु शकतात. दरम्यान भाजप हा मतदारंसघ सोडणार नसल्याचे समजते. पण नागवडे यांनीही अजित दादांच्या माध्यमातून महायुतीच्या उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न चालविले आहेत.
पक्षाची उमेदवारी मिळाली नाही, तर नागवडे थांबतील असा एक सुप्त प्रवाह विरोधक मतदारसंघात पेरीत आहेत. तथापि नागवडे थांबणार नाहीत तर लढणार व जिंकणारही आहेत, असा दावा वारंवार अनुराधा व राजेंद्र नागवडे करीत आहेत. महायुतीचा निर्णय वेगळा झाला तर काय करणार असा प्रश्न केल्यावर ‘उमेदवारी आम्हालाच आहे, दादांनी तसा शब्द दिलेला आहे. त्यामुळे प्रश्नच येत नाही. तरीही राजकारणात सगळे ग्राह्य धरुन आम्ही आमची तयारी सुरु ठेवली आहे. यावेळी नागवडे लढणारच हे सगळ्यांनी लक्षात घ्यावे’ असा संदेश त्यांना कार्यकर्त्यांना देतानाच विरोधकांना एक प्रकारचे आव्हानही दिले आहे.
नागवडे यांच्या जमेच्या बाजू म्हणजे, त्यांच्याकडे निष्ठावंत कार्यकर्त्यांचा मोठा जथ्था आहे. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची त्यांना भक्कम साथ दिसते. नातेगोत्यांचा मोठा आधार त्यांच्या राजकारणात राहिला आहे. महिला उमेदवार असल्याने महिलांमध्ये अनुराधा नागवडे यांची वेगळीच क्रेझ आहे.
नागवडे यांच्यासाठी अडचणीच्या बाजू म्हणजे ठराविक कार्यकर्त्यांचे कडे सामान्यांना त्यांच्यापर्यंत जावू देत नसल्याचा कायमच आरोप होत असतो. यावेळी त्यांना तो भेदावा लागेल. झोपडीतील मतदारांपर्यंत नागवडे पोचत नाहीत. शिवाजीराव नागवडे यांचे दुसरे पुत्र दीपक नागवडे यांचे थेट सक्रिय नसणे.नागवडे यांच्या गटाच्या जबाबदार कार्यकर्त्यांमध्येच नकारात्मक भावना जास्त दिसते.