नगर-दौंड महामार्ग – अगोदर कामात ठेकेदारी, आता टोलमध्ये हप्तेखोरी
संजय आ. काटे
श्रीगोंदा, ता. १६ : नगर-दौंड महामार्गाचे काम निकृष्ट झाले. तालुक्यातील कुठल्याच नेत्याची अथवा त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्याची काम रोखण्याची हिम्मत झाली नाही. ज्यांनी विरोध केला त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. आजही अनेक ठिकाणी रस्त्यांना क्रॅक पडलेत. अशाही परिस्थितीत सुरु केलेला टोल बंद पडू नये यासाठी काही समाजसेवक प्रयत्नशिल आहेत. टोलमधून हप्तेखोरी करुन संबधीतांना पाठीशी घालणाऱ्यांची सध्या जोरात चर्चा सुरु आहे.
सांगवीदुमाला ते निमगावखलू या दरम्यान हा टोलनाका उभारण्यात आला आहे. महामार्गाचे काम झाले असले तरी अनेक ठिकाणी रस्ता निकृष्ट आहे. लोणीव्यंकनाथ जवळील रेल्वेगेट येथील रस्ता खचलेला आहे. चिखली घाटातील रस्त्यालाही मोठे खड्डे आहेत. त्याशिवाय सिमेंट क्राॅक्रिटीकरण असणाऱ्या रस्त्यावर मोठे क्रॅक पडले आहेत. अशा परिस्थितीत आता टोल देणे व तेही जवळच्या लोकांना शक्य नाही. त्यामुळे व्यापारी व काही तरुणांनी एकत्र येत टोलनाका बंद पाडला. त्यात काही राजकीय नेते, कार्यकर्तेही सहभागी झाले होते.
टोलबद्दल अनेक आंदोलने झाली आहेत. पण आता काही लोकांनी याप्रश्नी उल्लू बनविण्याचे उद्योग सुरु केल्याची चर्चा आहे. संबधीत ठेकेदाराशी चर्चा करुन काही लोकांनी त्यात भागीदारही घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता निमगावखलू, सांगवी, काष्टी या भागातील ठराविक लोकांची वहाने टोलफ्री करण्याचे आश्वासन देवून हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यातच काल मंगळवारी पोलिस ठाण्यात बैठक बोलावली पण रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी बैठकीला अडीच तास उशिरा आले. त्यामुळे बैठक उधळण्यात आली. शिवाय हे अधिकारी काही नेत्यांच्या घरी चर्चा करुन मग बैठकीला आल्याचेही आरोप झाले.
त्यातच पोलिस प्रशासनाने यात मध्यस्थीची भूमिका घेतल्यावर त्यांच्या बोलण्यातून अधिकाऱ्यांना टोलचालकाची काळजी असल्याचे दिसले. प्रशासनापर्यंत हे हप्त्याचे लोण गेले आहे का? याची उलट सुलट चर्चा आहे.
राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र नागवडे यांनी मध्यंतरी टोलनाका दौंड हद्दीत हलवावा अशी भूमिका मांडली होती. मूळात त्यांना हे सांगण्यासही उशिर झाला. पण त्यांनी भूमिका घेतल्यावर पुढे काहीच केले नाही. आमदार बबनराव पाचपुते यांचीही याबाबतची भूमिका संशयास्पद आहे. घनशाम शेलार हे आंदोलनकर्त्यांसोबत आहेत. सुवर्णा पाचपुते यांनीही एका आंदोलनात चर्चा केली पण माजी आमदार राहूल जगताप यांच्यासह इतर दुसऱ्या व आमदारकी लढविण्यास तयारी करणाऱ्या नेत्यांना टोलबाबत काही माहिती आहे की नाही याचीच शंका आहे.
काष्टीची बाजारपेठ उध्दवस्त होवू देवू नका….
दौंडसह आसपासच्या भागातील अनेक ग्राहक काष्टीत येतात. पण आता जर त्यांना दीडशे रुपयांचा टोल भरावा लागणार असला तर ते ग्राहक येणार नाहीत. व्यापाऱ्यांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे याप्रश्नी मतभेत बाजूला ठेवून एकत्र येवून स्थानिक भागातील वीस किलोमीटर परिसरातील वहानांना टोल घेवू नये हीच आमची भूमिका आहे.
संजय काळे, अध्यक्ष व्यापारी संघटना काष्टी