आदीवासी मुलांमधील प्रगती पाहून झाले थक्क
श्रीगोंदा, ता. १६ : दोन दिवसांपूर्वी ‘संदीपदादा’चा फोन आला,’अनंत कुठे आहेस’? संस्थेचे काम कसे सुरु आहे. मुले किती ? आहेत. मी पुण्यामधून निघालोय येतोय तुम्हाला भेटायला आणि संस्थेतील मुलांसोबत जेवणं करायला. झक्कास जेवण बनवा. नियोजन करा. एक भजनी मंडळ पहा. ढोल ताशे पहा. खर तर हे सर्व योग जुळवून आणणे हे दिव्यस्वप्नच होते.
महामानव बाबा आमटे संस्थेतील आदिवासी मुलांसमवेत बाप्पा सोबत गप्पा या कार्यक्रमाचा एक भाग संस्थेत होणार हे तर आमच्या मुलांसाठी आणि आमच्या सर्वासाठी ही मोठी मेजवानी होती. समाजभान असणारा सुप्रसिद्ध अभिनेता मुलांना चक्क जवळून पाहता येणार आणि स्वभावात काटोकाट भरलेली सकारात्मकता त्यांच्या सहवासातून आम्हाला मिळणार याचा आनंद आणि समाधान देणारे होते.
दुपारी संदीप पाठक यांचे संस्थेत आगमन झाले.संस्थेतील सर्व मुलांनी ढोल, ताशाच्या आणि मुलींनी लेझीमच्या तालावर त्यांचे स्वागत केले.औक्षण झाल्यानंतर मुलांसोबत एक सामूहिक फोटो घेऊन राशीनची सुप्रसिद्ध शीपी आमटीचा आस्वाद संदीपजीनी मुलांसोबत जेवताना आनंद घेतला. मुलांसोबत गप्पा मारतांना भान हरवून त्यांच्याशी एकरुप झाले होते.
बाळूकाका यांनी आमच्या चिखली गावचे भजनी मंडळ तयारी करून आणले. यानंतर बाप्पा सोबत गप्पा या कार्यक्रमाची सुरुवात चिखलीच्या भजनी मंडळींनी आपल्या सुमधुर आवाजात गणरायाची भजन -गाणी गायली. यानंतर मुलांसोबत संदीप पाठक यांनी सोबत मनसोक्त गप्पा मारल्या. संदीप पाठक यांनी घरबसल्या आपल्या आवडत्या गणरायाचे दर्शन सर्वांना व्हावे आणि सामाजिक प्रबोधनाचे गणरायाचे स्वागत व्हावे. म्हणून हा कार्यक्रम निसर्ग हर्बल यांच्या सौजन्याने कार्यक्रमाचे आयोजन केले जाते याची प्राथमिक माहिती सर्वांना दिली. संस्थेतील यश साठे याने संत तुकडोजी महाराज यांचे हर देश में तू.. हे भजन गायीले आणि संदीप पाठक यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. त्यानंतर संस्थेतील आदिवासी मुलींनी स्त्री भ्रूणहत्या जागृतीसाठी वंशाच्या दिव्यापायी नको पणती विझवू आई, हे गीत गायले.
कार्यक्रमाच्या मध्यावर संस्थेच्या सुरुवातीचा प्रवास ते आजपर्यंतची वाटचाल यावर मुलाखत झाली. डॉ.अरुण रोडे , विकास पाटील, शुभांगी झेंडे , अश्विनी यांनी संस्थेच्या वाटचालीचा प्रवास मांडला. आदिवासी पारधी, भटक्या विमुक्त मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न किती संवेदनशील आहे.आणि त्यावर काम होणे किती गरजेचे आहे हे सांगितले. त्यावेळी संदिप पाठक यांना दहा वर्षांपूर्वी संस्थेला वाड्यात असताना भेट दिली होती. त्याची आठवण छायाचित्र ते पाहत होते. त्यातील विकास पाटील , महेश ही मुले संस्थेत शिकले असून संस्थेचे आधार देत असल्याचे पाहून त्यांना मनस्वी आनंद झाला. विशेषतः आदिवासी मुलींना शिक्षणाची मोठी गरज असून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम पाहून संदिप पाठक यांनी सर्व कार्यकर्त्यांचे कौतुक केले.
महामानव बाबा आमटे संस्थेत ६८ आदिवासी मुली निवासी आहेत. ह्या मुली शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहाव्यात म्हणून प्रज्ञा गुरुकुल ही संकल्पना संस्थेने सुरु केली. याची माहिती संदीपजी याना दिली. तसेच त्यांनी विशेषता मुलींशी संवाद साधला. दोन मुलींची अजब कहाणी एकूण त्याचे डोळेही पाणवले. संस्थेच्या माध्यमातून आता नवीन वसतिगृह झाले आहे. तिथे १०० आदिवासी मुलींची निवासाची सोय होत आहे याचे त्यांनी कौतुकही वाटलं.
बाप्प्पा सोबत गप्पा हा देशभरातील लोक त्यांचा उपक्रम पाहत असतात. त्यामुळे संस्थेचे काम देशभरातील लोक पाहतील. असा त्यांनी विश्वास दिला. बाप्पा सोबत गप्पा या कार्यक्रमाचा शेवट हा गणरायाच्या आरतीने झाला. यावेळी संदिपजी पाठक आणि संस्थेतील दोन आदिवासी कन्या दिव्या आणि काजळ यांनी गणरायाची आरती केली. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया उंदीर मामाकी जय या जयघोषाने संस्थेचा सर्व परिसर दुमदुमला
या तंत्र आणि यंत्राच्या युगात माणुसकीचा मंत्र जपणारा एक अवलिया आम्हा सर्वांना आनंद आणि सकारात्मकतेची ऊर्जा वाटून गेला.