शनिशिंगणापूरच्या शनिदेवाच्या अभिषेकासाठी यापुढे फक्त शुद्ध तेल

स्वयंभू शिळेची झीज रोखण्यासाठी देवस्थानाचा महत्त्वपूर्ण निर्णय

अहिल्यानगर जिल्ह्यातील शनिशिंगणापुर देवस्थानाने आता शनिदेवाच्या अभिषेकासाठी नवा नियम जाहीर केला आहे. आता भाविकांना फक्त शुद्ध आणि ब्रँडेड तेलानेच तैलाभिषेक करण्याची परवानगी असेल.

भेसळयुक्त तेलांमुळे स्वयंभू शिळेवर परिणाम....

भाविक मोठ्या श्रद्धेने शनिदेवाला तेल अर्पण करतात. मात्र, अन्न व भेसळ तपासणी अहवालांनुसार काही खाद्यतेलांमध्ये भेसळ आढळून आली आहे. विविध प्रकारचे सुटे आणि मिश्रित तेल केमिकलयुक्त असल्यामुळे शनिदेवाच्या स्वयंभू शिळेवर (शनी चौथऱ्यावर मूर्ती नसून दगडाची स्वयंभू शिळा आहे) हानिकारक परिणाम होत आहे.

देवस्थानाचा निर्णय आणि अंमलबजावणी…..

शिळेची झीज रोखण्यासाठी आणि तिचे संरक्षण करण्यासाठी शनिशिंगणापूर देवस्थानाच्या विश्वस्त मंडळाने १ मार्चपासून हा नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

भाविकांसाठी नवा नियम…

  • आता केवळ ब्रँडेड आणि शुद्ध रिफाइंड तेलानेच तैलाभिषेक करता येणार.
  • मिश्रित, सुटे किंवा अन्य प्रकारचे खाद्यतेल वापरण्यास मनाई असेल.

श्रद्धा आणि परंपरेचे जतन

शनिशिंगणापूर हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. शनिदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी येथे हजारो भाविक अभिषेकासाठी येतात. मात्र, शिळेचे संरक्षण करण्यासाठी हा निर्णय आवश्यक ठरल्याचे देवस्थानाने स्पष्ट केले आहे.