मतविभागणी हा विरोधकांचा मायनस पाॅईंट
संजय आ. काटे
श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात भाजपाने ऐनवेळी उमेदवारी बदलली असली तरी त्याचा फायदा विरोधकांना मिळणार नाही. आमदार बबनराव पाचपुते यांचा एकसंघ असणारा गट ही त्यांची सर्वात मोठी जमेची बाजू आहे. विरोधकांमधील दुफळीचा फायदाही त्यांना मिळणार असल्याने आज तरी विक्रम पाचपुते मतदार संघाच्या चर्चेत पुढे दिसत आहेत.
विधानसभा निवडणूक लागण्यापुर्वीच महाविकास आघाडीत कुरबुर सुरु झाली होती. त्यातच नैसर्गिक आघाडी असणारे नागवडे व जगताप हे दोन गट एकमेकांच्या विरोधात ठाकले होते. या दोघांची मतांची बेरीज पाचपुते यांच्यासाठी अडचणीची ठरते हा इतिहास आहे. त्यातच गेल्यावेळी थोड्या मतांनी पराभूत झालेले घनशाम शेलार हेही वेगळ्या मूडमध्ये होते. त्यामुळे गोंधळ उडण्यापुर्वीच अनुराधा नागवडे यांनी अगोदर हाताच्या मनगटावर घड्याळ बांधले आणि नंतर तेही बाजूला सारुन त्याच हातात शिवसेनेची मशाल घेतली.
आता उमेदवारी माघारीनंतर मतदारसंघाचे चित्र स्पष्ट झाले आहे. भाजपाने ऐनवेळी प्रतिभा पाचपुते यांच्याऐवजी त्यांचे पुत्र विक्रम पाचपुते यांच्या हाती कमळ दिले. महाविकास आघाडीकडून अनुराधा नागवडे, वंचितकडून अण्णासाहेब शेलार तर प्रमुख अपक्ष म्हणून माजी आमदार राहूल जगताप व भाजपाच्या सुवर्णा पाचपुते या आहेत. घनशाम शेलार यांची अनपेक्षीत माघार चर्चेत असली तरी तो विषय आता या निवडणूकीपुरता थांबला आहे.
२०१४ ला राहूल जगताप यांनी बबनराव पाचपुते यांचा पराभव केला अथवा २०१९ ला घनशाम शेलार यांचा पाचपुते यांच्याकडून निसटता पराभव झाला ही बाब या निवडणूकीत दिसणार नाही. त्याचे प्रमुख कारण म्हणजे यावेळी सरळसरळ लढत नाही याचा सर्वात मोठा फायदा पाचपुते गटाला आहे. त्यामुळेच त्यांनी ऐनवेळी उमेदवारी बदलण्याचे धाडस केले.
नागवडे व जगताप यांच्यात आता सरळसरळ मतविभागणी होणार आहे. अर्थात अण्णासाहेब शेलार हे कोणाची मते घेणार अशी चर्चा आहे. ते पाचपुते यांना अडचणीचे ठरु शकतात हा व्होरा राजकीय जाणकारांचा असला तरी त्यात पुर्णसत्य नाही. त्याचे कारण म्हणजे बेलवंडी गटात नागवडे यांचा बोलबाला आहे. तेथे शेलार हे त्यांचीच मते घेणार आहेत. श्रीगोंदा शहर, पारगाव, घारगाव, आढळगाव येथील शेलार घेणारे मते ही पाचपुते यांची जास्त असून शकतात. पण जगताप व शेलार यांची अनेक वर्षांची दुंभगलेली मैत्री ही जगताप यांनाही अडचणीची आहे. या सर्व घडामोडीत शेलार यांचा सगळ्यांनाच फटका बसणार असला तर पाचपुते त्याचा विचार करणार नाहीत.
त्यातच मुस्लिम समाजाची भाजप विरोधात असणारी एकगठ्ठा मते समोर एकाच उमेदवाराकडे जाणार नसल्याने सर्वात मोठा फायदा पाचपुते यांनाच होत आहे.
पाचपुते यांचा पाच वर्षातील गट अखंड आहे ही त्यांची सर्वात मोठी बाजू आहे. आमदार पाचपुते आजारी असले तरी त्यांचे कार्यकर्ते एकसंघ ठेवण्यासाठी विक्रम व प्रताप या दोघा बंधूंनी कसब दाखवले. त्यांच्यातून शिवसेनेचे उपनेते साजन पाचपुते बाजूला गेले आहेत. पण तो कालखंडही मोठा असल्याने आता त्यावर राजकीय इलाजही झाला आहे. यातून एकच स्पष्ट होत आहे की, पाचपुते गटाची वज्रमूठ विरोधकांसाठी सर्वात मोठा अडसर राहणार आहे.