उमेदवार- अनुराधा राजेंद्र नागवडे.. पक्ष शिवसेना (उबाठा) चिन्ह- मशाल
संजय आ. काटे
श्रीगोंदा विधानसभा निवडणूकीत मतदान यंत्रावर पहिल्या क्रमांकावर असणारे नाव आहे अनुराधा राजेंद्र नागवडे… चिन्ह मशाल…
२००९ ला विधानसभा लढण्याची चालून आलेली संधी सोडली, आणि २०१९ ला का थांबल्या हे कुणालाच समजले नाही. यावेळी अपक्ष लढणार असे वाटत असतानाच शेवटच्या टप्यात मशाल हाती घेतली. नागवडे कुटुंबाच्या राजकारणात खुप चुका झाल्या आणि होतही आहेत. त्यांची आमदार होण्याची संधी अजूनही संपलेली नाही फक्त लोकांच्या वाढलेल्या अपेक्षा आणि प्रचारातील नियोजन याची सांगड घालावी लागेल. विरोधकांचे काय चालले हे पाहण्यापेक्षा आपण कुठे कमी पडतोय याकडे लक्ष दिले तर संधी साधू शकतात.
अनुराधा नागवडे हे नाव गेल्या काही वर्षात श्रीगोंदा, अहिल्यानगरसह राज्यात गाजत आहे. शिवाजीराव नागवडे यांची सुन एवढाच वारसा त्यांच्यासोबत नाही तर त्यांच्या माहेरचा भक्कम सामाजीक वारसाही त्यांचे राजकीय कवच बनला आहे. बापु व राजेंद्र नागवडे यांच्या राजकीय विचारांचा त्यांच्यावर प्रभाव असणे साहजिकच आहे पण त्यासोबत त्यांनी स्वत:ची वेगळी ओळखही तयार केली आहे. खानदानी कुटुंबातील एक महिला राजकारणात झंझावात तयार करते हे सोपे नाही. आज त्याच अनुराधा नागवडे विधानसभा निवडणूक लढवित आहेत.
२००९ पहिल्यावेळी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी अनुराधा नागवडे यांना विधानसभेसाठी भाजपाची उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला होता. पण ऐनवेळी राजेंद्र नागवडे यांच्या गळ्यात भाजपाची उमेदवारी पडली. त्यानंतर २०१४ ला त्यांचे प्रयत्न होते. परंतू एकीच्या घोषणेत त्यांना थांबावे लागले. २०१९ ला संधी होतीच, राष्ट्रवादीचे तिकीट त्यांच्या दारात चालत आले होते पण त्यांना त्यावेळी थांबावे (की थांबवले) लागले. त्या का थांबल्या हे कोडे अजूनही कुणाला सुटलेले नाही.
२०१४ ते आजपर्यंत नागवडे कुटुंबाने तालुक्यात जे राजकारण केले त्यात अनेक चुका झाल्याचा जाणकारांचा कयास आहे. मूळात नागवडे कुटुंबाचे राजकारण सरळमार्गी असल्याने त्या चुका असल्याचे वरकरणी दिसते. २०१४ ला राहूल जगताप यांना आमदार करण्यासाठी बापुंनी जीवाचे रान केले. त्यानंतर अनुराधा नागवडे काहीशा बाजूला गेल्या. पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य होत्या पण त्यांनी स्वत:ला एका विशिष्ट राजकीय ठिकाणी थांबवून ठेवले होते. त्या वाट पाहत होत्या पुढच्या संधीच्या.
२०१९ ला लढल्या नाहीत, पण त्यानंतर राजेंद्र नागवडे यांनी गटाचे वेगळे महत्व निर्माण करणे आवश्यक होते, तसे झाले नसल्याचे दिसते. २०१९ ला त्यांचे प्रतिस्पर्धी आमदार बबनराव पाचपुते यांच्या प्रचारात ते सक्रिय झाले. त्यानंतर राहूल जगताप यांच्यासोबत जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक केली. पण नंतर पुन्हा पाचपुते यांची सोबत करीत कृषी उत्पन्न बाजार समिती व तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक केली. त्याचवेळी राहूल जगताप यांना मोकळीक दिली आणि त्यांनी नागवडे-पाचपुते यांच्या विरोधात स्वत:चा गट उभा केला. त्यात ते जिंकले आणि राहूल जगताप यांना खात्री पटली, की त्यांना आता नागवडे यांच्या मदतीची गरज नाही ते स्वत:च तालुक्यात राजकारण करु शकतात. हीच चूक नागवडे यांना आता नडत आहे. जगताप हे त्यापुर्वी नागवडे यांच्या राजकीय उपकाराच्या ओझ्याखाली होते. पण राजेंद्र नागवडे यांनीच त्यांचा संधी देत, लढायला शिकवले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आता हेच जगताप नागवडे यांच्यासाठी मोठी अडचण आहे.
नागवडे यांनी काही महिन्यात खूप पक्षांतरे केली. त्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. ही त्यांच्यासाठी अडचणीची बाजू आहे.
पण नागवडे यांना या निवडणूकीत अजूनही संधी आहे. त्यांनी लोकांच्या अपेक्षा वाढवून ठेवल्या आहेत त्या पूर्ण करतानाच एक नियोजनबध्द प्रचारयंत्रणा राबवली, जून्या सहकाऱ्यांना पुन्हा सोबत घेतले व ग्राऊंड रिपोर्टनूसार नियोजन केले तर त्यांना रोखणे अवघड आहे. एक महिला उमेदवार असल्याचा अनुराधा नागवडे यांच्याकडे प्लस पाँईंट आहे.