श्रीगोंद्याच्या निलंबीत तहसीलदार डाॅ. क्षितीजा वाघमारे यांनी त्यांच्यावरील कारवाईविरोधात न्यायालयात म्हणजे मॅट मध्ये धावा घेतल्याचे माहिती आहे. डाॅ. वाघमारे यांच्यावर एका प्रकरणात राज्य सरकारने निलंबनाची कारवाई केली आहे. या अपिलावर आज सुनावणी होणार असल्याचे समजते.
तहसीलदार डाॅ. वाघमारे यांच्यावर श्रीगोंदा शहरातील बहुचर्चित दि-कॉन्फरन्स ऑफ चर्चेस ऑफ क्राइस्ट इन वेस्टर्न इंडिया या संस्थेचा जमीन घोटाळा केल्याचा आरोप आहे. त्यात तहसीलदारांसह त्यांच्या कार्यालयातील चौघांना निलंबीत व्हावे लागले. पोलिसात गुन्हा दाखल झाल्यावर काही जणांना अटकही झाली, पण हे सगळे प्रकरण करणारा कोल्हापुर येथील दीपक नामदेव गायकवाड हा मास्टरमाईंड मात्र अजूनही फरारच आहे. विशेष म्हणजे २५ फेब्रुवारी रोजी श्रीगोंदा येथील जिल्हा सत्र न्यायालयाने त्याचा अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळला. न्यायालयाने यात अत्यंत कडक शब्दात तहसीलदार, दुय्यम निबंधक व आरोपींवर ताशेरे ओढले आहेत.
दरम्यान या कारवाईविरोधात आता डाॅ. वाघमारे यांनी मॅटमध्ये धाव घेतली आहे. आज सुनावणी होणार असून विधिज्ञ सतीश तळेकर हे त्यांची बाजू मांडणार असल्याची माहिती आहे.
