संजय आ. काटे : ता. १४ फेब्रुवारी २०२५
तालुक्याच्या हद्दीतून चार हायवे जातात. आता त्याच महामार्गांना जोडणाऱ्या महत्वाच्या गावांना पुन्हा नव्याने सिमेंट क्राॅक्रिटीकरणाच्या दर्जेदार रस्त्यांनी जोडणार असल्याची माहिती माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी आज दिली.
माजीमंत्री पाचपुते म्हणाले, नव्या दमाचा आमदार परिपक्व आहे. मतदारसंघाचा विकास कसा करायचा हे त्यांनी माहिती आहे. आमदार विक्रम पाचपुते यांच्या डोक्यात असणारा विकासाचा आराखडा कागदावर उतरत आहे. पुणे- नगर महामार्गावरील बेलवंडी फाटा ते बेलवंडी असा नवीन सिमेंट क्राॅक्रिटचा रस्ता होणार आहे. तो झाल्यावर त्या रस्त्यालगतची बेलवंडी सह उक्कडगाव, देवदैठण ही सगळीच गावांना मोठा फायदा होईल. शिवाय बेलवंडी ते पिंपळगावपिसा हाही रस्ता अशाच पध्दतीने केला जाणार आहे. त्या रस्त्यावरील वाढती वहातुक लक्षात घेवून आमदार विक्रम पाचपुते यांनी ‘आगे की सोच’ ठेवून हा रस्ता सिमेंट क्राॅक्रिटचा करण्याचा निर्णय घेतला आहे.
काष्टी ते पेडगाव व पेडगाव ते श्रीगोंदा शहर अशा दोन महामार्गांना जोडणारी गावेही अशाच पध्दतीच्या रस्ते होतील. शिवाय श्रीगोंदा शहरातून वडाळी, सुरोडीमार्गे कोळगाव येथील नगर-दौंड महामार्गाला नव्या रस्त्यांनी जोडले जाईल. शिवाय श्रीगोंदा शहरातून घोडेगाव, हिरडगावमार्गे कुळधरण ते कर्जत हा रस्ताही नव्याने तयार होणार आहे.