तर…. यंदा ‘घोड’खाली दुष्काळाचे सावट

संजय आ. काटे

घोड धरणातून अजून शेतीचे दोन आवर्तने होतील. त्यातील पहिले आवर्तन याच महिन्यात रब्बीचे सोडण्यात येईल व दुसरे उन्हाळी हंगामात होईल. परंतू धरणातून रोज १० दशलक्षघनफूट पाण्याची घट होत असून येत्या तीन महिन्यात धरणातील १ टीएमसी पाणी असेच कमी होणार आहे. त्यातच यंदा जर पावसाळा लांबला तर मात्र घोडच्या लाभक्षेत्रात संक्रात येण्याचा धोका आहे.
श्रीगोंदा, कर्जत या अहिल्यानगर जिल्ह्यासह शिरुर या पुणे जिल्ह्यातील तालुक्यातील शेती ओलिकाखाली आणणारा चिंचणी (पुणे) येथील घोड प्रकल्पात आज ३१०० दशलक्षघनफूट उपयुक्त पाणीसाठा आहे. त्यातून आता २० ते २५ फेब्रुवारीच्या दरम्यान रब्बीचे दुसरे आवर्तन सोडण्यात येणार आहे. या आवर्तनासाठी दोन्ही बाजूंना साधारण १ टीएमसी पाणी जाणार आहे. कागदावर नंतर २ टीएमसी पाणी दिसणार असले तरी ते वास्तव नसेल.
कारण धरणातून रोज १० दशलक्षघनफूट पाण्याची होणार घट चिंताजनक आहे. त्यामुळे महिन्याकाठी ३०० तर उन्हाळ्यात जवळपास १ टीएमसी पाणी कमी होणार असल्याने धरणातील पाणी १ टिएमसीवर येते. त्यातच पिण्यासह औद्योगिक वसाहतीसाठी राखीव पाणीसाठा वेगळाच आहे. शिवाय धरणातून अवैध उपसा मोठ्याप्रमाणात होतच आहे. या सगळ्या परिस्थितीत घोडीमधून उन्हाळ्याचे एकमेव आवर्तन मिळणार हे वास्तव आहे. आत्ता सुटणारे आवर्तन साधारण १२ ते १५ मार्चच्या आसपास बंद होईल.

श्रीगोंद्यातील गावांच्या उपसा योजना यंदा नाहीत….
श्रीगोंदा तालुक्यातील काही गावांच्या धरणातून थेट गावात पाणी आणणाऱ्या योजना यंदा सुरु होणार नसल्याची माहिती आहे. बेलवंडी, वांगदरी, मढेवडगाव या योजनांच्या पाण्याला मंजूरी यंदा नाही. अर्थात त्यांनी पाण्याची अजून मंजूरीच घेतली नसल्याचीही चर्चा होती. पण त्याबाबत निश्चित माहिती मिळाली नाही.

धरणातील उपसा बंद करण्याची मोहिम…..
घोड धरणातून मोठ्या प्रमाणात बेकायदेशिर पाण्याचा उपसा होतो. त्याला काही वर्षात राजमान्यता मिळाली. नेत्यांचे फोन गेले की धरणातून पाणी शेतात येण्याचा मार्ग मोकळा होतो. त्यामुळे धरणातून आसपासच्या गावातील बड्या शेतकऱ्यांनी अशा पाईपलाईन टाकलेल्या आहेत. पण आता ज्या उपसा योजनांना परवानगी नाही त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असून त्यासाठी एक खास पथक तयार करण्यात येवून अशा बेकायदेशिर योजना बंद करण्यात येणार असल्याची माहिती घोडचे उपअभियंता महेश शिंदे यांनी दिली.