राजेंद्र नागवडे यांची घोषणा

सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना चालू गळीत हंगामातील उसाचा विक्रमी दर देत आहे. नागवडे कारखान्यावर ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांला यंदा प्रतीटनाला तीन हजार पन्नास रुपये मिळणार आहेत ही माहिती कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र शिवाजीराव नागवडे यांनी दिली.
पत्रकात नागवडे यांनी म्हटले आहे की, सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना ऊस भावामध्ये आतापर्यंत कधीही मागे राहिलेला नाही.सातत्याने चांगला ऊस दर देऊन सभासद व ऊस उत्पादक शेतकरी यांच्या हिताला प्राधान्य दिलेले आहे. सभासद शेतकऱ्यांना मागील २०२३ -२४ मध्ये दिलेल्या शब्दांनुसार मागील वर्षीची एफआरपी सोबतच प्रतीटन २९०० याप्रमाणे ऊस पेमेंट अदा करून सभासद शेतकऱ्यांची दिवाळी गोड केली आहे. आता चालू गळीत हंगामात गाळपास आलेल्या उसाचा पहिला हप्ता २८०० रुपये टनाप्रमाणे डिसेंबर अखेरपर्यंतचे पेमेंट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमाही झाले आहे.
नागवडे म्हणाले, स्वर्गीय शिवाजीराव बापू नागवडे यांच्या विचार प्रेरणेने नागवडे कारखान्याने सातत्याने दिलेल्या शब्दाप्रमाणे चांगला ऊस दर व इतर पूर्तता केलेली आहे. त्यामुळेच सभासद व ऊस उत्पादकांचा विश्वास संपादन केलेला आहे. जिल्ह्यात इतर कारखान्यांच्या तुलनेत नागवडे कारखाना ऊस भावात कधीही मागे राहणार नाही. म्हणूनच चालू गाळपात ३०५० चा अंतीम दर जाहीर केला आहे. उदिष्टापेक्षा जास्त गाळप झाल्यास हा दर अजूनही वाढू शकतो असाही आशावाद नागवडे यांनी व्यक्त केला.