अनुराधा नागवडे यांच्या विजयासाठी येणार धावून
संजय आ. काटे
श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील निवडणूकीत पुन्हा एक नवा ट्विस्ट आला असून,जेष्ठ नेते घनशाम शेलार हे महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी सरसावण्याची शक्यता आहे. कार्यकर्त्यांनी बैठकीत समोर विरोध चालेल पण पाठीत खंजीर खुपसणाऱ्यासोबत नको असा आग्रह धरल्याचे समजते. त्यामुळे शेलार हे लवकरच नागवडे यांच्या प्रचाराची धुरा खांद्यावर घेतील असे खात्रीशिररित्या समजले.
महाविकास आघाडीतून उमेदवारीसाठी प्रयत्नशिल असणारे जेष्ठ नेते घनशाम शेलार यांनी ऐनवेळी प्रहारची उमेदवारी घेतली. पण काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह पक्ष निरीक्षकांनी त्यांच्यावर आदरयुक्त दबाव आणत ती उमेदवारी मागे घेण्यास भाग पाडले, असे शेलार यांनीच यापुर्वी सांगितले आहे. गेल्या विधानसभा निवडणूकीत शेलार यांचा आमदार बबनराव पाचपुते यांनी निसटत्या मतांनी पराभव केला होता. यावेळीही ते विधानसभा लढण्यासाठी पाच वर्षे लोकसंपर्कात होते. पण त्यांना महाविकास आघाडीची उमेदवारी मिळाली नाही.
आता शेलार नेमकी काय भूमिका घेणार याची उत्सुकता आहे. त्याच पार्श्वभुमिवर शेलार यांनी काल (सोमवारी) प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली. समजलेल्या माहितीनूसार, बैठकीत काही कार्यकर्त्यांनी निर्णयाचा सर्वाधिकार शेलार यांना देण्याचे ठरले. बहुतेक कार्यकर्त्यांनी जिल्ह्यात आपण बाळासाहेब थोरात यांच्या विचाराशी बांधील असल्याने काँग्रेसला अडचण होणार नाही अशी भूमिका घ्यावी असे सुचविले. काहींनी आपण इतरांचाही पर्याय तपासण्याचे म्हणणे मांडले.
याबाबत घनशाम शेलार म्हणाले, कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीसोबत जाण्याबाबत मते मांडली आहेत. त्यातच बाळासाहेब थोरात यांनी सतत संपर्क साधत, सोबत रहा जिल्ह्यात आपली गरज आहे असे सांगितले आहे. निवडणूकीबाबत लवकरच निर्णय घेवू.