मोहाळाचा दगड मारला….खरी लढाई आत्ता सुरु झाली
संजय आ. काटे
शिवसेना व ठाकरे कुटुंबाकडे चुकीचे बोट करण्याची हिम्मत कुणाची झाली नाही. ज्यांचे स्वकतृत्व शून्य आहे त्या राहूल जगताप यांनी शिवसेनेवर गलिच्छ आरोप केले. जगताप यांना माहिती नाही पण त्यांनी मोहाळाला दगड मारण्याची चूक केली आहे. त्यांना आता ते भोगावेच लागणार असून विधानसभेची लढाई खरी आत्ता सुरु झाली असून जगताप यांना त्यांच्या शब्दांचा करारा जबाब मिलेगा असा सज्जड इशारा शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते साजन पाचपुते यांनी दिला.
साजन पाचपुते म्हणाले, शिवेसना कायम सामान्यांच्या हिताचे राजकारण करते. ज्याला कुणी वाली नाही तेथे शिवसेना धावून जाते. त्यामुळे सामान्यांना शिवसैनिकांचा खरा आधार आहे. पण राहूल जगताप हे माजी आमदार आहेत, त्यांना अजूनही शिवसेना व त्यांची ताकत माहित झालेली नाही. आमच्यावर व आमच्या नेत्यांवर बिनबुडाचे आरोप करीत आहेत.
महाविकास आघाडीची उमेदवारी मिळविण्याचा प्रयत्न ते जसे करीत होते तसाच प्रयत्न मी व अनुराधा नागवडे याही करीत होत्या. ही लढाई नागवडे कुटुंबांने जिंकल्यावर राहूल जगताप यांना मिरच्या का झोंबल्या हे कळत नाही. ज्याच्याकडे विजयी होणारी गणिते आहेत त्यालाच महाविकास आघाडीची उमेदवारी मिळाली. पण त्यानंतर रडीचा डाव खेळत जगताप यांनी आरोप सुरु केले. ज्या नागवडेंनी तुम्हाला २०१४ मध्ये आमदार केले त्यांना तुम्ही शिव्या देताय याची जाणीव त्यांना नव्हती. आमच्या नेत्यांवर आरोप केले.
साजन पाचपुते म्हणाले, २०१४ आमदार असतानाही २०१९ च्या निवडणूकीतून विद्यमान आमदार माघार का घेतात याचे उत्तर आपण दिलेले नाही. निवडणूकीत कार्यकर्ते फोडण्यासाठी पैशाची रास ओतण्याची भाषा करणाऱ्यांना कुकडी कारखान्यात शेतकऱ्यांचे पैसे का थकविले याचेही उत्तर अजून मिळालेले नाही.
राहूल जगताप यांना उद्देशून साजन पाचपुते म्हणाले, तुम्ही परत आता आमदार होणार नाहीत, कारण ज्या बापुंनी तुम्हाला आमदार केले त्यांच्याच कुटुंबावर बेछूट आरोप करीत आहात. बापुंनी जो त्याग केला तो त्याग करण्याची संधी तुम्हाला होती पण तुम्ही राजकारण केले. हरकत नाही, आमच्यावर आरोप केले त्याबद्दल आम्हाला वाईट वाटले नाही. पण बापुंच्या कुटुंबावर आरोप करताना तुमची भाषा खालच्या पातळीवर घसरते त्यातच सगळे आले आहे. ही लढाई आता खरी सुरु झाली आहे. जगताप यांना आता करारा जबाब देणार असून विधानसभेत ते नाही तर फक्त अनुराधा नागवडे याच दिसतील हे माझे आव्हान आहे.